बातम्या

वाहनाचं सर्वेक्षण ते टोल दरवाढ रद्द… 16 निर्णयांवर शिक्कामोर्तब

Vehicle survey to toll rate hike canceled 16 decisions sealed


By nisha patil - 10/13/2023 4:56:24 PM
Share This News:



मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री दादा भुसे यांच्यात आज महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत टोलबाबतचे 16 महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. त्याची अंमलबजावणी महिन्याभरात केली जाणार आहे.

vo मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी आज एक महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीला स्वत: सार्वजनिक बांधकाम मंत्री दादा भुसे उपस्थित होते. यावेळी टोलच्या मुद्द्यावर तब्बल सव्वा दोन तास चर्चा झाली. या बैठकीत एकूण 16 निर्णय घेण्यात आले. त्यानंतर राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन या निर्णयाची माहिती दिली.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या टोल आंदोलनाला मोठं यश आलं आहे. राज ठाकरे यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री दादा भुसे यांच्याशी टोलबाबत चर्चा केली. यावेळी एक दोन नव्हे तर 16 निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे. यातील काही निर्णयांची आजपासूनच अंमलबजावणी करण्यात येणार आहे. तर काही निर्णयांच्या अंमलबजावणीसाठी सरकारने एक महिन्याचा कालावधी मागून घेतला आहे. यात मुंबईतील पाचही एन्ट्री पॉइंटवर सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यापासून ते ठाण्यातील टोलनाक्यांवरील छोट्या वाहनांचा टोल टॅक्स माफ करण्याबाबतच्या निर्णयाचा समावेश आहे.

पाच एन्ट्री पॉइंटवर टोलची दरवाढ झाली आणि त्यामुळे नऊ वर्षानंतर टोलचा विषय ऐरणीवर आला. त्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान केलं आणि चलबिचल सुरू झाली. एन्ट्री पॉइंट आणि पुणे एक्सप्रेसवे सोडून सर्व टोलनाक्यांवरून लहान गाड्यांना टोल माफ झाला होता. त्यामुळे इतर टोलनाक्यावर टोल माफ आहे का ते पाहिलं पाहिजे, असं राज ठाकरे म्हणाले.

आजच्या बैठकीत टोलनाक्यांच्या जवळ महिला आणि पुरुष प्रसाधन गृह ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सरकार त्याची अंमलबजावणी करणार आहे. पण आम्ही मनसेच्यावतीने मुंबईतील पाचही एन्ट्री पॉइंटला महिला आणि पुरुषांसाठी प्रत्येकी 10 स्वच्छता गृहे ठेवणार आहोत, अशी घोषणा राज ठाकरे यांनी केली.

16 महत्त्वाचे निर्णय…
येत्या 15 दिवसात सर्व एन्ट्री पॉइंटवर सरकार सीसीटीव्ही कॅमेरे लावेल. त्या ठिकाणी मनसेचेही कॅमेरे लावले जातील. रोज किती वाहने येतात आणि किती जातात याची मोजदाद ठेवली जाईल. त्यासाठी ही व्हिडीओग्राफी उद्यापासून सुरू होणार आहे. मंत्रालयात एक सेल स्थापन केला जाणार आहे. टोलनाक्यावरील सीसीटीव्हीवर मंत्रालयातून वॉच केला जाईल.

 

टोलनाक्यावर पुरुष आणि स्त्रियासंसाठी स्वच्छ प्रसाधन गृह ठेवले जाईल. प्रथोमपाचारासाठीची सेवा, रुग्णवाहिका, क्रेन, पोलीस अंमलदार. तक्रार वही आदी गोष्टी असतील. प्रवाशांसाठी टोल नंबर दिला जाईल. लोकांना त्या नंबरवर मेसेज करून तक्रार देता येईल. या यंत्रणेचे नियंत्रण मंत्रालयात असेल.
आयआयटीच्या तज्ज्ञांकडून सर्व उड्डाण पूल आणि भुयारी मार्गांचं स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात येणार आहे.

 

ठाण्यात चारचाकींना पाच रूपयांची दरवाढ करण्यात आली आहे. ही दरवाढ रद्द करण्यात येणार आहे. त्यासाठी एक महिन्याचा अवधी सरकारला दिला आहे.
 

प्रत्येक टोल नाक्यावर पूर्वी असलेली येलो लाईन सुरू करण्यात येणार आहे. या येलो लाईनच्या पुढे 200 ते 300 मीटरच्या पलिकडे असलेल्या वाहनांना टोल न घेताच सोडलं जाईल. कोणत्याही टोलनाक्यावर 4 मिनिटाच्या पलिकडे एकही गाडी थांबणार नाही प्रत्येक टोलनाक्यावर पोलीस तैनात ठेवणार आहेत. बाऊन्सर ठेवले जाणार नाहीत. टोलनाक्यावर फास्टॅग चालला नाही तर एकदाच पैसे भरावे लागतील.
कितीचं टेंडर आहे? कितीचा टोल आहे? तो आकडा दिला जाईल. रोजची वसुली किती होते? टोलचे किती पैसे जमा झाले? किती उरले? याची माहिती टोलनाक्यावरील बोर्डवर दिली जाईल. टोलनाक्याच्या दोन्ही बाजूला हे डिजिटल बोर्ड लावले जातील.

 

ठाण्याच्या आनंद नगर टोल नाक्यावरून ठाण्यातील नागरिकांना ऐरोलीला जायचं असेल तर दोनदा टोल भरावा लागतो. तो आता एकदाच भरावा लागेल. एक महिन्याच्या आत त्याचा निर्णय होईल.
मुलुंडच्या हरिओम नगर परिसरातील लोकांसाठी पूल बांधला जाईल. म्हणजे हरिओम नगरमधील नागरिकांना टोल भरावा लागणार नाही.
इतर राज्यात गुळगुळीत रस्ते दिसतात. महाराष्ट्राने काय घोडं मारलं? महापालिका, केंद्र सरकार आणि राज्य सरकारची एकत्र बैठक होत नाही, त्यामुळे चांगले रस्ते मिळत नाही. त्यामुळे याचा एकत्रित निर्णय करावा लागेल.

 

सार्वजनिक बांधकाम विभागाचे 29 आणि महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे 15 असे 44 जुने टोलनाके बंद करण्याचा निर्णय घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी एक महिन्याचा कालावधी मागितला आहे. त्यावर ते निर्णय घेतील. जड अवजड वाहने कोणत्याही लेनमध्ये येतात. त्यामुळे वाहतूक कोंडी होते. या प्रकाराला महिन्याभराच्या आत शिस्त लावली जाईल.टोल प्लाजा परिसरात राहणाऱ्या नागरिकांना सवलत मिळावी म्हणून पास दिले जाणार आहेत.


वाहनाचं सर्वेक्षण ते टोल दरवाढ रद्द… 16 निर्णयांवर शिक्कामोर्तब