बातम्या

मणिपूर घटनेच्या निषेधार्थ संविधान परिवारची जोरदार निदर्शने

Violent protests by the Constituent Assembly against the Manipur Constitution


By nisha patil - 7/25/2023 12:51:15 PM
Share This News:



इचलकरंजी : प्रतिनिधी   3 मे पासून उसळलेला मणिपूरमधला शासन पुरस्कृत हिंसाचार हा आपल्या लोकशाहीवरचा आघात आहे. त्याचा आम्ही तीव्र निषेध करत आहोत. मणिपूरमधील हिंसाचाराकडे बेजबाबदारपणे दुर्लक्ष करणाऱ्या पंतप्रधान व गृहमंत्र्यांनी तसेच राज्यात कायदा सुव्यवस्था राखण्यात अपयशी ठरलेल्या मणिपूरच्या मुख्यमंत्र्यांनी त्वरीत राजीनामा द्यावा अशी मागणी संविधान परिवार आणि जनआंदोलनांचा राष्ट्रीय समन्वय यांच्यावतीने महात्मा गांधी पुतळा चौकात निदर्शने करत व्यक्त करण्यात आली.

यावेळी लोकराजा राजर्षी शाहू संविधान संवादक केंद्राचे कार्याध्यक्ष सुनिल स्वामी म्हणाले, " गेले तीन महिने मणिपूर जळते आहे. गेल्या दोन महिन्यापेक्षा जास्त काळ येणाऱ्या हिंसाचाराच्या बातम्या दडपल्या जात आहेत. इंटरनेट बंद आहे. मणिपूरमध्ये मानवी हक्कांची, संविधानाची उघडउघड पायमल्ली सुरू आहे. आदिवासी आणि बिगरआदिवासी जाती जमातींना एकमेकांविरुध्द उभे केले जात आहे. विद्वेषाच्या राजकारणात मणिपूर होरपळत आहे.

विवेकवाहिनीच्या राधिका शर्मा म्हणाल्या," मणिपूरमध्ये भर दिवसा पुरुषांचा प्रचंड जमाव दोन स्त्रियांना विवस्त्र करून त्यांची धिंड काढतो व त्यांच्यावर लैंगिक हल्ले करतो , ही अत्यंत व्यथित करणारी आणि संतप्त करणारी घटना उघडकीस आली आहे. देशात महिलांना जगणे मुश्कील होत असताना सरकार काय करत आहे? "असा सवाल उपस्थित केला.

जनआंदोलनांचा राष्ट्रीय समन्वयचे राज्य समन्वयक संजय रेंदाळकर म्हणाले, "4 मेच्या या घटनेचा व्हिडिओ तब्बल 77 दिवसांनी समोर आला आणि या घटनेला वाचा फुटली. आता, अशा शेकडो घटना घडल्या व घडत आहेत असे खुद्द मणिपूरचे मुख्यमंत्री म्हणत आहेत. हे अत्यंत संतापजनक, दुःखद आणि मानवतेला काळीमा फासणारे आहे."

मणिपूरमधील हिंसाचाराला नजरअंदाज करणा-या गृहमंत्र्यांनी तसेच राज्यात कायदा सुव्यवस्था स्थापन न करु शकलेल्या मणिपूरच्या मुख्यमंत्र्यांनी त्वरीत राजीनामा द्यावा.
सध्या देशाच्या राष्ट्रपति या आदिवासी महिला आहेत , त्यांनी मणिपूरमध्ये चालू असलेल्या हिंसाचाराची दखल घ्यावी आणि मणिपूरमध्ये कायदा व सुव्यवस्था प्रस्थापित व्हावी व तेथील जनजीवन सुरळीत व्हावे यासाठी त्वरीत पावले उचलावीत ,अशीही मागणी यावेळी करण्यात आली.या निदर्शनात प्रा. अमर कांबळे, बजरंग लोणारी, बसवराज कोटगी, रोहित दळवी, अशोक वरुटे, अमोल पाटील, प्रशांत खांडेकर, शरद वास्कर, विनायक होगाडे, सनोफर नायकवडी, उर्मिला कांबळे, अमित कोवे, पवन होदलूर, प्रशांत आवळे, दिग्विजय चौगुले, साद चांदकोटी, दामोदर कोळी यांच्यासह अन्य उपस्थित होते.


मणिपूर घटनेच्या निषेधार्थ संविधान परिवारची जोरदार निदर्शने