बातम्या
सांगलीत विशाल पाटलांची आघाडीवर
By nisha patil - 4/6/2024 2:03:31 PM
Share This News:
सांगली लोकसभा मतदारसंघात सकाळी 8 वाजता मतमोजणीला सुरुवात झाली आहे. मतमोजणीच्या सुरुवातीच्या टप्प्यात भाजपच्या संजयकाका पाटील यांनी आघाडी घेतली होती. मात्र, सुरुवातीच्या अर्धा तासानंतर काँग्रेसचे बंडखोर आणि अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांनी प्रचंड मोठी आघाडी घेतली आहे. तर ठाकरे गटाचे चंद्रहार पाटील यामध्ये दिसेनासे झाले आहेत आलेली माहितीनुसार, विशाल पाटील यांनी सांगली लोकसभेच्या सहापैकी सहा मतदारसंघांमध्ये आघाडी घेतली आहे. सांगलीत महाविकास आघाडीने विशाल पाटील यांना उमेदवारी द्यावी, असा स्थानिक कार्यकर्त्यांचा आग्रह होता. मात्र, ही जागा ठाकरे गटाच्या वाट्याला आल्याने चंद्रहार पाटील यांना रिंगणात उतरवले गेले. यामुळे नाराज झालेल्या विशाल पाटील यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरला होता. महाविकास आघाडीच्या मतांची विभागणी झाल्यामुळे भाजपच्या संजयकाका पाटील यांना फायदा मिळण्याची शक्यता होती. मात्र, मतमोजणीच्या पहिल्या तासाभरानंतर विशाल पाटील यांनी 7000 मतांची आघाडी घेतली आहे.
मतमोजणीचे कल हे सातत्याने बदलत आहेत. पहिल्या तासाभरात लोकसभेच्या एकूण 543 जागांपैकी 511 जागांचे कल हाती आले आहेत. यामध्ये एनडीए 350, काँग्रेस 87 आणि इतर उमेदवार 28 जागांवर आघाडीवर आहे. तर महाराष्ट्रात महायुती 22 आणि महाविकास आघाडीचे उमेदवार 19 जागांवर आघाडीवर आहे. यामध्ये भाजप 14, शिंदे गट 6, अजित पवार गट 2, ठाकरे गट 7 आणि शरद पवार गटाचे उमेदवार 4 जागांवर आघाडीवर आहेत. तर काँग्रेस पक्षाचे 8 उमेदवार आघाडीवर आहेत.
सांगलीत विशाल पाटलांची आघाडीवर
|