बातम्या
विवेकानंदमध्ये भारत पाकिस्तान 1971 च्या युध्दातील युध्दसैनिकांचा सन्मान
By nisha patil - 12/18/2024 10:34:23 PM
Share This News:
कोल्हापूर : देशाचे ऐक्य आणि अखंडता टिकवण्यासाठी भारतीय स्थलसेना नौसेना आणि वैदलाच्या सैनिकांनी आणि अधिकाऱ्यांनी केलेल्या अतुल्य पराक्रमामुळे आज आपण संपूर्ण विश्वात सुरक्षित नागरिक आणि महासत्ता म्हणून उदयास आलो आहोत . भारतीय सैनिकांचे निरनिराळ्या युद्धजन्य परिस्थितीत केलेलं कार्य हे साहस आणि वीरतेचे प्रमाण आहे . सैनिकांच्या या अखंड त्याग वृत्तीमुळे भारताचे सार्वभौमत्व हे चिरंतन टिकून आहे असे मत कर्नल देशपांडे यांनी मांडले .
विवेकानंद शिक्षण संस्था आणि विवेकानंद कॉलेज हे थोर स्वातंत्र्यसैनिक परमपूज्य शिक्षण महर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांच्या अथक प्रयत्नातून उभारले गेले असल्याने देश सेवा आणि अखंडतेचा संस्कार विद्यार्थ्यांमध्ये सदैव बाणविला जातो असे मत प्रा सुरेश थोरात यांनी अध्यक्षीय मनोगतात मांडले. विवेकानंद महाविद्यालयात भारत पाकिस्तान 1971 युद्धाच्या स्मृतिदिनानिमित्त साजरा केल्या गेलेल्या विजय दिनानिमित्त माजी सैनिक सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता. सदरच्या कार्यक्रमात 1962, 1965, 1971 युद्धातील आणि त्यानंतरच्या युद्धजन्य स्थिती मधील अतुलनीय कामगिरी बजाविणाऱ्या भारतीय सैनिकांचा गौरव करण्यात आला . सदरच्या कार्यक्रम सैनिक कल्याण फेडरेशन कोल्हापूर आणि आयक्युएसी सेल यांचे मार्फत आयोजित करण्यात आला . कार्यक्रमासाठी कोल्हापूर जिल्ह्यातील 250 1962 65 71 चे युद्ध सैनिक उपस्थित होते .युद्धजन्य परिस्थितीत साहसी वृत्तीने पराक्रम बजाविणाऱ्या कर्नल विजय गायकवाड, कॅप्टन एन एन पाटील, कॉर्पोरेल एमडी देसाई, सीपीओ पठाडे, सीईपी पृथ्वीराज देसाई, कॅप्टन चव्हाण, कॅप्टन कोबळे यांचा विवेकानंद महाविद्यालयामार्फत सन्मानपत्र आणि मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला . औपचारिक कार्यक्रमा अगोदर अमर जवान स्मृतीस पुष्पचक्र वाहून आदरांजली व्यक्त करण्यात आली .
कार्यक्रमाचे प्रास्ताविक लेफ्टनंट जितेंद्र भरमगोंडा यांनी तर स्वागत श्री बी टी पाटील यांनी केले कार्यक्रमाचे आभार मेजर सुनिता भोसले यांनी मानले आणि सूत्रसंचालन प्रा. विश्वंभर कुलकर्णी यांनी केले कार्यक्रमाचे आयोजन प्राचार्य डॉ. आर आर कुंभार, प्रा डॉ श्रुती जोशी, कर्नल मानस दीक्षित, कर्नल संधान मिश्रा यांच्या मार्गदर्शनाखाली केले गेले. सदरच्या कार्यक्रमास शहाजी कॉलेज, न्यू कॉलेज छत्रपती शाहू कॉलेज कॉमर्स कॉलेज येथील एनसीसी विद्यार्थी उपस्थित होते.
विवेकानंदमध्ये भारत पाकिस्तान 1971 च्या युध्दातील युध्दसैनिकांचा सन्मान
|