बातम्या

इंडिया आघाडीच्या वतीने पंतप्रधान पदाचा चेहरा कोण? शरद पवार म्हणाले….

Who is the face of the post of Prime Minister on behalf of India Aghadi


By nisha patil - 1/13/2024 6:46:03 PM
Share This News:



पुणे  : विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीकडे सत्ताधारी पक्षांसह देशाचं लक्ष आहे. लोकसभेची निवडणूक अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. त्यामुळे सत्ताधारी भाजप सरकारला आव्हान देण्यासाठी इंडिया आघाडी काय पावलं टाकते हे पाहणं महत्त्वाचं आहे. देशातील नागरिकांसाठी इंडिया आघाडी एक नवा पर्याय उपलब्ध करुन देणार असल्याचं या आघाडीचे नेते बोलत आहेत. पण या आघाडीचा प्रमुख चेहरा कोण, पंतप्रधान पदासाठी कोण चेहरा असेल? याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. याशिवाय इंडिया आघाडीचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरल्याचीदेखील माहिती समोर आलेली नाही. काही दिवसांपूर्वी संजोयक ठरवल्याची माहिती समोर आली होती. इंडिया आघाडीची नुकतीच दिल्लीत एक बैठक पार पडली होती. या बैठकीत काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना पंतप्रधान पदाचा उमेदवार ठरवावा, अशा प्रस्तावावर चर्चा झाल्याची माहिती समोर आली होती. पण तरीही फार असा काही मोठा निर्णय या बैठकीत समोर आला नव्हता. त्यामुळे इंडिया आघाडीच्या आगामी रणनीतीबाबत जनतेच्या मनातही उत्सुकता आहे.
    इंडिया आघाडीच्या रणनीतीबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. शरद पवार आज जुन्नरच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यावेळी त्यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी इंडिया आघाडीबाबत विचारलेल्या विविध प्रश्नांवर सविस्तर भूमिका मांडली. “मला आनंद एका गोष्टीचा आहे की, आज या देशाला पर्याय देण्यासाठी विविध राजकीय पक्ष जे आजच्या सत्ताधारी पक्षांच्या भूमिकेशी सहमत नाहीत असे सगळे एकत्र येत आहेत आणि एकत्र येऊन लोकांना पर्याय देत आहेत ही जमेची बाजू आहे”, असं शरद पवार म्हणाले.

इंडिया आघाडीत नाराजी आहे का?

यावेळी शरद पवारांना इंडिया आघाडीत नाराजी आहे का? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी “काही नाराजी नाही. संयोजकाची जबाबदारी नितीश कुमार यांनी घ्यावी असं सगळ्यांनी सुचवलं आहे. पण साधारणत: त्यांचं मत असं बनलं, जे प्रमुख होते, त्यांनी त्यांची जागा निश्चित करावी, संयोजकाची गरज नाही”, असं स्पष्टीकरण शरद पवारांनी दिलं.

इंडिया आघाडीचा पंतप्रधान पदाचा चेहरा कोण?

यावेळी शरद पवार यांना इंडिया आघाडीचा आगामी लोकसभा निवडणुकीत प्रमुख चेहरा कोण असेल? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी सविस्तर भूमिका मांडली. “आम्हाला कुणालाही एकाला पुढे करावं आणि मतं मागावी याची गरज वाटत नाही. आम्हाला ही खात्री आहे की, उद्या निवडणुका जाहीर झाल्या तर आम्ही निश्चितपणाने देशाला पर्याय देऊ शकतो. तुम्हाला आठवत असेल, 1977 साली लोकांनी निवडणुका लढवल्या. त्यानंतर पक्षाची निवड झाली, त्यानंतर मोरारची देसाई यांची निवड झाली. निवडणुकीला जाताना मोरारजी देसाई यांना पुढे केलेलं नव्हतं. त्यावेळेला लोकांच्या भावना लक्षात घेऊन मतं मागितली होती. त्यामुळे कुणालाही पुढे करण्याची आवश्यता नाही”, असं शरद पवार म्हणाले.


इंडिया आघाडीच्या वतीने पंतप्रधान पदाचा चेहरा कोण? शरद पवार म्हणाले….