बातम्या

संभाजीराजेंची उमेदवारी ठाकरेंनी का नाकारली? ‘त्या’ ड्राफ्टमध्ये काय होतं? मंत्री उदय सामंत नी केला गौप्यस्फोट

Why did Thackeray reject Sambhaji Raj s candidature


By nisha patil - 2/5/2024 7:36:57 AM
Share This News:



कोल्हापूर :प्रतिनिधी अडीच वर्षांपूर्वी राज्यसभेच्या निवडणुकीवेळी संभाजीराजे छत्रपती यांचा अवमान शिवसेना ठाकरे गटाने केला असल्याचा आरोप उदय सामंत यांनी केला आहे. मंत्री उदय सामंत आणि उद्धव ठाकरे, 
 

लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीने कोल्हापूरमधून शाहू महाराज छत्रपती यांना उमेदवारी दिली आहे. शाहू महाराज छत्रपती यांच्याविरोधात शिवसेना शिंदे गटाने संजय मंडलिक यांना उमेदवारी दिल्यामुळे छत्रपती घराण्याचा अवमान महायुतीने केला असल्याचा आरोप महाविकास आघाडीच्या नेत्यांनी अनेकदा केला. आता यावरुनच शिवसेना शिंदे गटाचे नेते, मंत्री उदय सामंत यांनी आज पत्रकार परिषद घेत शिवसेना ठाकरे गटावर आरोप करत मोठे गौप्यस्फोट केले आहेत.
राज्यसभेच्या निवडणुकीवेळी संभाजीराजे छत्रपती यांचा अवमान शिवसेना ठाकरे गटाने केला असल्याचा आरोप उदय सामंत यांनी यावेळी केला. तसेच उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत संभाजीराजे छत्रपती यांचा आणि संजय राऊत यांचा व्हिडीओ दाखवत संभाजीराजे छत्रपती यांचा अवमान कुणी केला?, असा सवाल ठाकरे गटाला केला आहे
राज्यसभेच्या निवडणुकीवेळी संभाजीराजे छत्रपती यांना शिवसेनेकडून उमेदवारी मिळणार असल्याची चर्चा त्यावेळी होती. यासंदर्भात संभाजीराजे यांच्याबरोबर चर्चाही झाली होती. मात्र, त्यानंतर संभाजीराजे छत्रपती यांना उमेदवारी न देता ठाकरे गटाकडून संजय पवार यांना उमेदवारी दिली होती. या सर्व घडामोडी संदर्भात उदय सामंत यांनी व्हिडिओ दाखवत उद्धव ठाकरे यांनी संभाजीराजे छत्रपती यांच्याकडून कोणता ड्राफ्ट लिहून घेतला होता? याबाबत गौप्यस्फोट केला.

 

छत्रपती शाहू महाराज यांचा सन्मान आम्ही राखतो. पण गादीचा सन्मान राखतो असे आता सांगणाऱ्यांनी संभाजीराजे छत्रपती यांना उमेदवारी का नाकारली? असा सवाल सामंत यांनी केला. तसेच त्यावेळी संभाजीराजे छत्रपती यांना आधीच सांगितलं असतं की, संजय पवार यांना तिकीट देणार आहोत, तर त्यांचा अवमान झाला नसता. मात्र, माझी प्रामाणिक इच्छा होती की, संभाजीराजे खासदार व्हावेत. तसेच मी देखील सांगितलं होतं की, संभाजीराजेंकडून असा ड्राफ्ट लिहून घेऊ नये. पण मला त्यावेळी वरिष्ठांनी सांगितलं की, आपण उमेदवारी देत आहोत, तर लिहून घ्यायला काय हरकत आहे, असेही सामंत यावेळी म्हणाले. ‘त्या’ ड्राफ्टमध्ये नेमकं काय होतं ? “संभाजीराजे छत्रपती यांना ज्यावेळी उमेदवारी देण्यात येईल, त्यानंतर ते शिवसैनिक म्हणून ग्रामपंचायतीपासून ते थेट खासदारकीपर्यंत शिवसेना पक्षाचा प्रचार करतील! संभाजीराजे छत्रपती हे पुरस्कृत उमेदवार असले तरी ते सभागृहात आणि सभागृहाबाहेर पक्षाचे काम करतील. त्यांनी शिवसेनेची भूमिका मांडली पाहिजे. याबरोबरच संभाजीराजे छत्रपती यांनी पक्षप्रमुख हे आमचे नेते आहेत असे मान्य केले पाहिजे, असे मुद्दे त्या ड्राफ्टमध्ये होते”, असा गौप्यस्फोट सामंत यांनी केला आहे.
 

दरम्यान, एखादे तरी छत्रपती आपल्यासोबत असावेत, अशी भूमिका त्यावेळी शिवसेना ठाकरे गटाची होती, असे सांगत आता छत्रपती घराण्याचा ज्यांना पुळका आला आहे. ते तेव्हा राज्यसभेला संभाजीराजे छत्रपती यांचा अवमान करत होते, ड्राफ्ट लिहून घेत होते, त्यामुळे त्यांनी संभाजीराजे यांना तिकीट का दिले नाही? हे सांगावे, असे आव्हान उदय सामंत यांनी ठाकरे गटाला केले आहे. यावेळी शिंदे गटाचे कार्यकर्ते उपस्थित होते.


संभाजीराजेंची उमेदवारी ठाकरेंनी का नाकारली? ‘त्या’ ड्राफ्टमध्ये काय होतं? मंत्री उदय सामंत नी केला गौप्यस्फोट