बातम्या

दसर्‍याला आपट्याची पाने सोने म्हणून का देतात? यामागचे महत्त्व घ्या जाणून

Why do you give Apta leaves as gold on Dussehra


By nisha patil - 10/23/2023 7:06:51 AM
Share This News:



हिंदू धर्मात दसरा म्हणजेच विजयादशमीला खूप महत्त्व आहे. चातुर्मासात अश्विन महिन्यातील शुद्ध प्रतिपदेपासून ते नवमीपर्यंत नवरात्र साजरे केल्यानंतर दहाव्या दिवशी म्हणजेच दशमीला दसरा साजरा केला जातो. हा सण वाईटावर चांगल्याचा विजय म्हणून साजरा केला जातो. विजयदशमी आणि दसऱ्याला आपट्याच्या झाडांची पाने सोने म्हणून एकमेकांना दिले जातात. पण तुम्हाला माहिती आहे का, या दिवशी आपट्यांची पाने का वाटली जातात? यामागचे महत्त्व जाणून घेऊयात.मान्यतेनुसार, या दिवशी प्रभू श्रीरामांनी रावणाचा वध करून दुष्टाईचा अंत केला होता. दुसर्‍या मान्यतेनुसार, दुर्गामातेने ९ दिवस युद्धानंतर महिषासुराचा वध केला. दसरा शब्दाचा अर्थ दशहरा असा होतो. दश म्हणजे दहा आणि हरा म्हणजे पराभव. तसेच माता दुर्गेच्या नऊ रुपांनी दाही दिशांवर विजय मिळवला,असेही म्हटले जाते. याशिवाय, याच दिवशी पांडवांनी अज्ञातवास संपताच शक्तीपूजन करून शमीच्या वृक्षावरची आपली शस्त्रे परत घेतली आणि विराटाच्या गायी पळवणार्‍या कौरव सैन्यावर स्वारी करून विजय मिळवला.

दसऱ्याच्या दिवशी मित्रांना आणि नातेवाईकांना आपट्याची पाने देऊन विजयदशमीच्या शुभेच्छा दिल्या जातात. दसऱ्याच्या दिवशी आपट्यांच्या पानाला विशेष महत्त्व आहे. आपट्याच्या पानांना सोन्याचे प्रतीक मानले जाते. प्रभू श्रीरामाच्या पूर्वजांकडे खूप संपत्ती होती. परंतु, श्रीरामाने ती दान करत वानप्रस्थाश्रम स्वीकारला. मात्र त्यावेळी त्यांचे कुलगुरू कौत्स मूनी यांनी प्रभू रामाकडे १४ कोटी सुवर्ण मुद्रा दान मागितली. पण प्रभूरामाकडे काहीच संपत्ती नसल्याने त्यांनी गुरूंची मागणी पूर्ण करण्यासाठी इंद्र देवांना युद्धाचे आव्हान दिले. या युद्धात इंद्रदेवाचा पराभव झाला. त्यावेळी प्रभूरामांनी मला तुमचे राज्य नको, फक्त १४ कोटी सुवर्ण मुद्रा हव्या आहेत, अशी मागणी केली. यानंतर इंद्रदेवांनी पृथ्वीवरील आपट्यांच्या पानावर सुवर्ण मु्द्रा सोडली. यामुळे विजयदशमीला सोने म्हणून आपट्यांची पाने लुटली जातात, असे म्हटले जाते.


दसर्‍याला आपट्याची पाने सोने म्हणून का देतात? यामागचे महत्त्व घ्या जाणून