बातम्या
महाशिवरात्री का साजरी केली जाते आणि द महाशिवरात्रीचे महत्त्व
By nisha patil - 8/3/2024 7:39:12 AM
Share This News:
प्रत्येक चंद्रमासातील चौदावा दिवस किंवा अमावास्येच्या आधीचा दिवस शिवरात्री म्हणून ओळखला जातो. वर्षभरात येणाऱ्या सर्व बारा शिवरात्रींपैकी, फेब्रुवारी-मार्चमध्ये येणाऱ्या महाशिवरात्रीचे सर्वात विशेष आध्यात्मिक महत्त्व आहे. या रात्री, पृथ्वीचा उत्तर गोलार्धाची स्थिती अशा प्रकारे असते की मानवामध्ये नैसर्गिकरित्या उर्जेचे एक उधाण निर्माण होते. हा असा दिवस असतो जेव्हा निसर्ग एखाद्याला त्याच्या आध्यात्मिक शिखराकडे ढकलत असतो. याचाच उपयोग करून घेण्यासाठी या परंपरेत आपण एक विशिष्ट सण स्थापित केला आहे जो रात्रभर चालतो.या नैसर्गिक ऊर्जेची वाढ होऊ देण्यासाठी, रात्रभर चालणाऱ्या या उत्सवाचा एक मूलभूत उद्देश म्हणजे तुम्ही रात्रभर तुमच्या पाठीचा कणा सरळ ठेवून जागे राहणे.
महाशिवरात्रीचे महत्व
जे लोक आध्यात्मिक मार्गावर आहेत त्यांच्यासाठी महाशिवरात्री खूप महत्त्वाची आहे. जे लोक कौटुंबिक परिस्थितीत आहेत त्यांच्यासाठी आणि जगातील महत्वाकांक्षी लोकांसाठी देखील ती खूप महत्वाची आहे. जे लोक कौटुंबिक परिस्थितीत आहेत ते महाशिवरात्रीला शिवाच्या विवाहाचा उत्सव म्हणून पाहतात. महत्वाकांक्षी लोक ह्या दिवसाला शिवाने आपल्या सर्व शत्रूंवर विजय मिळविल्याचा दिवस म्हणून पाहतात.
पण, संन्यासी लोकांसाठी, हा तो दिवस आहे जेव्हा शिव कैलास पर्वतासोबत एकरूप झाला. तो पर्वतासारखा पूर्णपणे अचल झाला. यौगिक परंपरेत, शिवाला देव म्हणून पूजले जात नाही, तर त्याला आदिगुरू मानले जाते, ज्याच्यापासून योगशास्त्राची उत्पत्ती झाली. अनेक सहस्र वर्षे ध्यानावस्थेत राहल्यानंतर एक दिवशी तो पूर्णपणे निश्चल झाला. तो दिवस म्हणजे महाशिवरात्री. त्याच्या सर्व हालचाली थांबल्या आणि तो पूर्णपणे अचल झाला, म्हणून संन्यासी लोक महाशिवरात्रीला निश्चलतेची रात्र मानतात.
महाशिवरात्रीचे आध्यात्मिक महत्त्व
पौराणिक कथांव्यतिरिक्त योग परंपरेमध्ये या दिवसाला आणि या रात्रीला इतके महत्त्व दिले जाते, याचे कारण ही रात्र साधकाला उच्च अध्यात्मिक शक्यता उपलब्ध करून देते. आधुनिक विज्ञान अनेक टप्प्यांतून गेले आहे आणि आज अशा टप्प्यावर पोहोचले आहे की जिथे ते तुम्हाला हे सिद्ध करून दाखवायला तयार आहे की तुम्हाला जीवन म्हणून माहित असलेली प्रत्येक गोष्ट, तुम्हाला भौतिक पदार्थ आणि अस्तित्व म्हणून माहित असलेली प्रत्येक गोष्ट, तुम्हाला ब्रह्मांड आणि आकाशगंगा म्हणून माहित असलेली प्रत्येक गोष्ट, फक्त एकच ऊर्जा आहे जी लाखो वेगवेगळ्या मार्गांनी प्रकट होते.
हे वैज्ञानिक वास्तव प्रत्येक योग्यामध्ये एक जिवंत अनुभव आहे. "योगी" या शब्दाचा अर्थ असा आहे की ज्याने अस्तित्वाचे ऐक्य जाणले आहे. जेव्हा मी "योग" म्हणतो, तेव्हा मी कोणत्याही एका विशिष्ट पद्धतीबद्दल किंवा प्रणालीबद्दल बोलत नाही. अमर्याद जाणून घेण्याची सर्व तळमळ, अस्तित्वातील ऐक्य जाणून घेण्याची सर्व तळमळ म्हणजे योग. महाशिवरात्रीची रात्र मनुष्य हे अनुभवण्याची संधी देते.
महाशिवरात्री का साजरी केली जाते आणि द महाशिवरात्रीचे महत्त्व
|