बातम्या

शंभर कोटी रस्त्यांची डांबर चाचणी अद्याप का नाही

Why is there no asphalt test of hundred crore roads yet


By nisha patil - 7/15/2024 10:54:23 PM
Share This News:



महाराष्ट्र सुवर्णजयंती नगरोत्थान योजनेतून शहरातील सोळा रस्त्यांसाठी शंभर कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. यातील पाच रस्त्यांचे काम एवरेस्ट कंपनीने सुरु केले आहे. एस्टीमेट प्रमाणे काम व्हावे, तसेच रस्त्यांचा दर्जा टिकावा यासाठी आम आदमी पार्टीकडून या कामाचा पाठपुरावा केला जात आहे. या पार्श्वभूमीवर महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. 

रस्त्याचा दर्जाचा राखला जावा यासाठी सेहचाळीस वेगवेगळ्या चाचण्या करायच्या आहेत. रस्त्यामधील डांबराचे प्रमाणे मोजणारी सर्वात महत्वाची अशी बिटूमीन कंटेन्ट चाचणी देखील यामध्ये समाविष्ट आहे. रस्ते करून महिना उलटला तरी ही चाचणी का केली गेली नाही, यामागे काही गौडबंगाल आहे का असा सवाल आप चे प्रदेश संघटन सचिव संदीप देसाई यांनी महापालिका प्रशासनाला केला. यावर सल्लागार कंपनीच्या कसबेकर यांनी याबाबत कंत्राटदाराला वेळोवेळी कळवले तरी त्यांचा प्रतिनिधी उपस्थित राहत नसल्याने ही चाचणी होऊ शकली नसल्याचे मान्य केले. 

पाच रस्त्यापैकी ज्यावर गटार चॅनेल आहेत, तिथे संपूर्ण रुंदीला रस्ता केला आहे. गटार करताना रस्ता परत उकरला जाणार, हे म्हणजे वरातीमागून घोडे असा प्रकार आहे. शासनाने दिलेल्या निर्देशांमध्ये स्पष्ट उल्लेख असताना युटीलिटी किंवा गटार करण्यासाठी रस्ते उकरल्यास त्याचा खर्च अधिकाऱ्यांच्या खिशातून घ्यावा अशी मागणी देसाई यांनी अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे यांच्याकडे केली.

यावर शहर अभियंता नेत्रदिप सरनोबत यांनी येथून पुढच्या कामात गटार चॅनेलचे काम आधी करणार असल्याचे सांगतिले.

चप्पल लाईनच्या रस्त्याचे काम गतीने करावे, ताराबाई पार्क येथील दामिनी हॉटेल समोरील रस्त्याचे त्वरित रिस्टोरेशन करावे, अन्यथा आंदोलन करू असा इशारा शहराध्यक्ष उत्तम पाटील यांनी केली.

कावळा नाका येथील नियाज हॉटेल समोरील रस्ता, यादवनगर चौक, प्रतिभानगर येथील हवामहल रस्ता, तसेच सेव्हन्थ डे शाळेच्या रस्त्यावर खड्ड्यामुळे अपघात होण्याची दाट शक्यता आहे. हे रस्ते तातडीने दुरुस्त करावेत अशी मागणी आप शिष्ट मंडळाने केली. 

शंभर कोटींच्या रस्ते विषयावर पंधरा दिवसांनी पुन्हा बैठक घेण्याचे ठरले.

यावेळी जल अभियंता हर्षजीत घाटगे, उपशहर अभियंता आर के पाटील, महादेव फुलारी, सतीश फप्पे, सुरेश पाटील, आप चे शहर महासचिव अभिजित कांबळे,मोईन मोकाशी,मयुर भोसले, दुशंत माने, सुधाकर शिंदे, उमेश वडर, वल्लभ पाटील, फिरोज सतारमेकर आदी उपस्थित होते.


शंभर कोटी रस्त्यांची डांबर चाचणी अद्याप का नाही