बातम्या

श्रीमंत शाहू महाराज लोकसभेच्या रिंगणात उतरणार का?

Will Rich Shahu Maharaj enter the arena of Lok Sabha


By nisha patil - 8/19/2023 5:02:23 PM
Share This News:



राष्ट्रवादीमध्ये झालेल्या बंडाळीनंतर 25 ऑगस्ट रोजी कोल्हापुरात शरद पवार यांची दसरा चौकात भव्य सभा होत आहे. या सभेच्या अध्यक्षस्थानी शाहू महाराज असणार आहेत. त्यामुळे शाहू महाराज लोकसभेच्या रिंगणात उतरणार का? अशी चर्चा रंगली असतानाच आता त्यांनीच खुलासा करत उमेदवारीच्या चर्चेवर पडदा टाकला. माझी यापूर्वीच खासदार होण्याची इच्छा होती, अशी प्रतिक्रिया शाहू महाराज यांनी दिली आहे.

 राष्ट्रवादीच्या सभेचे निमंत्रण मी स्वीकारले असून त्या सभेला मी उपस्थित राहणार याबाबत दुमत नाही. पण राष्ट्रवादीच्या उमेदवारीसाठी मी इच्छूक आहे असे जे म्हणत आहे ते त्यांनाच जावून विचारा. महाविकास आघाडीकडून लोकसभेसाठी इच्छूक आहात का? अशी विचारणा करताच त्यांनी सांगितले की, होय मी खासदारकीसाठी इच्छूक होतो, पण 1998 च्या निवडणुकीमध्ये.

आमदार सतेज पाटील यांनी शाहू महाराजांच्या उमेदवारीवर बोलताना सांगितले की, महाराजांबद्दल आम्हाला आदर आहे. मात्र, त्यांची इच्छा काय आहे महत्वाचं आहे. पुरोगामी विचाराचा महाविकास आघाडीचा उमेदवार निवडून यावा, अशी इच्छा आहे. 

दरम्यान, गेल्या काही महिन्यांपासून शाहू महाराजांनीच लोकसभेची उमेदवारी घ्यावी, यासाठी महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून प्रयत्न सुरु आहेत. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनीही त्यांची राजवाड्यावर जाऊन भेट घेतली होती. शाहू महाराज यांचा महाविकास आघाडीमधील तिन्ही पक्षातील नेत्यांशी तसेच जिल्ह्यामध्येही घनिष्ठ संबंध असल्याने आगामी लोकसभा निवडणुकीत जागा वाटपात महाविकास आघाडीच्या कोणत्याही पक्षाकडे ही जागा आली, तरी महाराजांना उमेदवारी कोणतीही अडचण येणार नव्हती. मात्र, आता महाराजांनीच भूमिका स्पष्ट केल्याने उमेदवारीच्या चर्चेवर पडदा पडल्याचे बोलले जात आहे. मात्र, शरद पवार यांच्या आजवरच्या राजकारणाचा विचार ऐनवेळी धक्कातंत्राचा वापर होणार का? याची शक्यता नाकारता येत नाही. 

राज्यात गेल्या काही दिवसांपासून कोल्हापूर जिल्हा अत्यंत संवेदनशील झाला आहे. शिवराज्याभिषेक दिनी झालेल्या प्रकारानंतर शहरात दंगल भडकल्याने पुरोगामी बाण्यालाच धक्का लागला होता. यानंतर शाहू महाराज यांनी थेट भूमिका घेताना भाजपवर सडकून टीकास्त्र सोडले होते. त्यानंतर काढण्यात आलेल्या सद्भभावना रॅलीतून समतेचा जागर करण्यात आला होता. या रॅलीचे नेतृत्व महाराजांनीच केले होते.


श्रीमंत शाहू महाराज लोकसभेच्या रिंगणात उतरणार का?