ताज्या बातम्या
न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर यांच्या निधनाने परखड भाष्यकार, कृतीशील विचारवंत हरपला उपमुख्यमंत्री अजित पवार यांची आदरांजली
By nisha patil - 1/25/2025 1:40:06 PM
Share This News:
न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर यांच्या निधनाने परखड भाष्यकार, कृतीशील विचारवंत हरपला
उपमुख्यमंत्री अजित पवार यांची आदरांजली
मुंबई, दि. 25 :– “ज्येष्ठ साहित्यिक, माजी न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर यांच्या निधनाने सामाजिक मुद्यांवर परखड भाष्य करणारा कृतीशील विचारवंत हरपला आहे. कायद्याचे अभ्यासक, मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती राहिल्याने समाजातील घडामोडीचा समतोल आणि चिकित्सक अभ्यास करण्याचे कसब त्यांच्याकडे होते. वैचारिक निष्ठा आणि बांधिलकी जपत राजकीय, सामाजिक विषयांवर स्पष्ट भूमिका घेणारे, साहित्यातून आपली भूमिका ठामपणे मांडणारे लेखक म्हणून त्यांनी ओळख निर्माण केली. ते मराठवाड्याचे सुपुत्र होते.
मराठवाड्याच्या राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक इतिहासाचा त्यांचा गाढा अभ्यास होता. त्यांनी लिहिलेली पुस्तके आणि लेखांमध्ये त्यांच्यातला विचारवंत ठळकपणे दिसतो. देशाचा स्वातंत्र्यलढा, मराठवाडा मुक्तीसंग्रामातही त्यांनी मोलाचं योगदान दिलं. त्यांनी लिहिलेलं 'गांधी आणि संविधान' पुस्तक संविधान आणि गांधीविचारांचं अलौकिक दर्शन घडवणारं आहे. वर्ध्याला झालेल्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. त्यावेळी अध्यक्षीय भाषणात साहित्यिक आणि राजकीय नेतृत्वं दोघांच्याही जबाबदाऱ्यांवर त्यांनी केलेलं भाष्य सर्वांसाठी मार्गदर्शक ठरलं आहे. आदरणीय नरेंद्र चपळगावकर सरांसारख्या व्यक्तिमत्वाचं निधन ही महाराष्ट्राच्या साहित्यिक, सामाजिक, वैचारिक चळवळीची हानी आहे. मी त्यांना भावपूर्ण आदरांजली वाहतो,” अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्या कार्याचे स्मरण करुन त्यांना आदरांजली वाहिली आहे.
न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर यांच्या निधनाने परखड भाष्यकार, कृतीशील विचारवंत हरपला उपमुख्यमंत्री अजित पवार यांची आदरांजली
|