"सुलोचनादीदींच्या जाण्याने अवघी चित्रपटसृष्टी पोरकी
By nisha patil - 5/6/2023 6:39:16 PM
Share This News:
तारा न्यूज वेब टीम ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना लाटकर यांचे निधन झाले असून त्यांच्या पार्थिवावर आज सायंकाळी 5.30 वाजता शिवाजी पार्कमधील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. आता त्यांचे पार्थिव प्रभादेवी येथील त्यांच्या राहत्या घरी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले आहे. दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुलोचना दीदींच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले आहे. राज्यशासनाच्या वतीने सुलोचना दीदींना श्रद्धांजली अर्पण करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले," सुलोचनादीदींचे निधन ही अत्यंत दुःखद, रसिकांच्या मनाला चटका लावणारी घटना आहे. त्यांच्या जाण्याने चित्रपटसृष्टी पोरकी झाली आहे. त्या चित्रपटसृष्टीतल्या मूर्तिमंत वात्सल्य होत्या. आपल्या वैशिष्ट्यपूर्ण अभिनयाने त्यांनी 300 हून अधिक चित्रपटांमध्ये आपला ठसा उमटवला. विशेषकरून त्यांनी साकारलेली ‘आई’ची भूमिका ठसा उमटवणारी ठरली".
मुख्यमंत्री पुढे म्हणाले,"ज्येष्ठ अभिनेते देवानंद, राजेश खन्ना, अमिताभ बच्चन यांच्या सारख्या दिग्गज कलावंतांसोबत त्यांनी चित्रपटांत काम केले. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये मायेची पाखरण करणाऱ्या वात्सल्यमूर्ती हरपल्या. त्यांच्या जाण्याने प्रत्येकालाच वाटते की आपल्यातलेच कुणी गेले आहे. इतका प्रेम, जिव्हाळा त्यांनी निर्माण केला आहे".
सुलोचना लाटकर यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतल्यानंतर शोक व्यक्त करत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले,"आपल्या चित्रपटसृष्टीमध्ये काही नावं अशी आहेत. ज्यांच्या कार्यकर्तृत्वामुळे ती अजरामर आहेत. चित्रपटसृष्टीत त्यांच्याबद्दल प्रचंड आदर आहे. यातीलच एक नाव सुलोचनादीदींचे आहे. सुरुवातीच्या काळामध्ये त्यांनी नायिकेच्या भूमिका साकारल्या. नंतर आईच्या भूमिका साकारल्या, त्या अत्याधिक लोकप्रिय झाल्या".
"सुलोचनादीदींच्या जाण्याने अवघी चित्रपटसृष्टी पोरकी
|