बातम्या

महावितरण कर्मचाऱ्यांच्या अथक प्रयत्नाने ‘चिक्केवाडी’ पुन्हा उजळली

With the tireless efforts of the Mahavitaran employees


By nisha patil - 9/27/2024 11:05:57 PM
Share This News:



कोल्हापूर, दि.२७ सप्टेंबर २०२४ : ‘चिक्केवाडी’ (ता. भुदरगड) येथील वीज पुरवठा पावसामुळे गेली काही दिवस बंद होता. घनदाट जंगलातील १० किलोमीटर मध्ये असलेल्या १५६ पोलची पाहणी करण्यात पाऊस व वारा यामुळे अनेक अडचणी येत होत्या. महावितरणच्या ११ जिगरबाज अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सहा वीज ग्राहकांचा वीज पुरवठा दोन दिवस अथक मेहनत घेत पूर्ववत केला आहे. महावितरणच्या या कामाकरता ‘चिक्केवाडी’ ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे.  

    महावितरणच्या गारगोटी उपविभाग अंतर्गत येणाऱ्या शाखा कार्यालय पाटगाव मधील ‘चिक्केवाडी’ या वाडीला ११ केव्ही ‘पाटगाव’ या उच्चदाब वाहिनीवरील ‘चिक्केवाडी’ या रोहित्रावरून विज पुरवठा होतो. ‘चिक्केवाडी’ला वीज पुरवठा करणारी ही वाहिनी तांबाळे ते भटवाडी व भटवाडी ते ‘चिकेवाडी’ अशी एकूण ३२ किलोमीटर अंतरावरून जाते. यापैकी  भटवाडी ते ‘चिकेवाडी’ या १० कि.मी. अंतरात एकूण १५६ विद्युत पोल आहेत. वीज पुरवठा सुरळीत करण्याकरता १० किलोमीटर अंतरातील १५६ पोलची पाहणी महावितरणच्या या टीमने काही दिवस सलग करत होते. या पाहणीत दोन पिन इन्सुलेटर नादुरुस्त सापडले ते बदलण्यात आले आहेत.  
  
या होत्या अडचणी 

‘चिक्केवाडी’चा वीजपुरवठा सुरळीत करताना कर्मचाऱ्यांना अनेक नैसर्गिक अडचणींचा सामना करावा लागाला. भटवाडी येथे असलेला ओढा ही पहिली व प्रमुख अडचण होती. पाण्याचा प्रवाह तीव्र असल्याने ओढा पार करून पुढे जाणे जिकीरीचे होते. सतत पडणारा पाऊस, वाहणारा वारा याचाही सामना कर्मचाऱ्यांना करावा लागला. भटवाडी ते ‘चिक्केवाडी’ हा १० किलोमीटरचा पायवाट रस्ता अत्यंत निसरडा होता. हा संपूर्ण जंगल परिसर असल्याने मोबाईल नेटवर्क ही नव्हते त्यामुळे वीज वाहिनी चाचणी घेण्यासाठी संपर्क साधण्यात देखील अडचण येत होती. या सर्व अडचणींवर मात करत व वन विभागाचे नियम पळून महावितरण कर्मचाऱ्यांनी ही मोहीम फत्ते केली.

ग्राहकांच्या चेहऱ्यावरील समाधान पाहून कामाचा क्षीण गेला

वीज पुरवठा सुरळीत झाल्यानंतर ‘चिक्केवाडी’ ग्रामस्थांच्या चेहऱ्यावरील समाधान पाहून केलेल्या कामाचा क्षीण काही क्षणात नाहीसा झाला, अशा भावना शाखा अभियंता अक्षय नाडे यांनी व्यक्त केल्या. या कामात पांडुरंग शिंदे, मंगेश आदर्शे, समिंदर साठे, सुहास पाटील, नितीन कांबळे, किरण स्वामी, पंढरीनाथ भालेकर, सुशांत पाटील, अक्षय ढोकरे, विक्रम राऊळ या कर्मचाऱ्यांनी महत्वाची कामगिरी बजावली.


महावितरण कर्मचाऱ्यांच्या अथक प्रयत्नाने ‘चिक्केवाडी’ पुन्हा उजळली