बातम्या
महिलांनी आपल्या आरोग्याकडे लक्ष द्यावे -डॉ सुप्रिया देशमुख
By nisha patil - 8/3/2024 6:27:56 PM
Share This News:
महिलांनी आपल्या आरोग्याकडे लक्ष द्यावे -डॉ सुप्रिया देशमुख
-डी. वाय. पाटील कृषी व तंत्र विद्यापीठात महिला दिन उत्साहात
तळसंदे /वार्ताहर सर्वच महिलांना एकाच वेळी अनेक जबाबदाऱ्या पार पडण्याची कसरत करावी लागते. त्यासाठी आपली प्रकृती उत्तम असणे गरजेचे असून महिलांनी आपल्या आरोग्याकडे सर्वप्रथम लक्ष द्यावे असे आवाहन सिव्हिल सर्जन डॉ. सुप्रिया देशमुख यांनी केले. डी वाय पाटील कृषी व तंत्र विद्यापीठ तळसंदे येथे आयोजित जागतिक महिला दिन कार्यक्रमात प्रमुख पाहुण्या म्हणून त्या बोलत होत्या.
डॉ. सुप्रिया देशमुख म्हणाल्या, स्त्रीला घर, समाज आणि कामाच्या ठिकाणी वावरताना वेगवेगळ्या भूमिकांमध्ये काम करावे लागते. स्त्री ही प्रत्येक घराचा कणा असते. त्यामुळेच आपण आपल्या आरोग्याकडे विशेष लक्ष दिले पाहिजे. वयाच्या तिशीनंतर वेगवेगळ्या आरोग्य तपासण्या करून घ्याव्यात. स्वतःसाठी वेळ द्यावा. योग्य आहार आणि झोपही महत्वाची आहे. त्याचबरोबर योगासने व इतर व्यायाम प्रकार यासाठी महिलांनी वेळ द्यावा असे आवाहन त्यांनी केले. महिलांमध्ये आढळणारे विविध आजार त्याची लक्षणे व उपचार घ्यावयाची काळजी, हार्मोन संतुलन याबद्दलही त्यांनी माहिती दिली.
कुलगुरू डॉ. के. प्रथापन यांनी जागतिक महिला दिनाचे महत्त्व विषद केले. महिलांनी प्रत्येक क्षेत्रात आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. प्रत्येकाच्या जीवनात महिलांचे स्थान महत्वाचे आहे. तिचा कायमच सन्मान राखणे व तिला प्रोत्साहन देणे हे समाजाची कर्तव्य असल्याचे सांगितले.
कुलसचिव डॉ. जे. ए . खोत यांनी प्रमुख पाहुण्यांची ओळख करून दिली. महिला दिन एका दिवसापुरता साजरा न करता वर्षभर महिलांचा आदर सन्मान राखला पाहिजे असे त्यांनी सांगितले.
यावेळी असोसिएट डीन डॉ. शुभांगी जगताप यांच्यासह महिला प्राध्यापक, कर्मचारी, विद्यार्थिनी उपस्थित होत्या.कुलपती डॉ. संजय डी पाटील, संस्थेचे उपाध्यक्ष आमदार सतेज डी. पाटील, विश्वस्त आमदार ऋतुराज पाटील, कार्यकारी संचालक डॉ. ए . के. गुप्ता यांचे मार्गदर्शन व प्रोत्साहन लाभले.
महिलांनी आपल्या आरोग्याकडे लक्ष द्यावे -डॉ सुप्रिया देशमुख
|