बातम्या
महिलांच्या हक्काचा दिवस म्हणजेच 'जागतिक महिला दिन
By nisha patil - 8/3/2024 7:36:33 AM
Share This News:
जागतिक महिला दिन' हा दिवस जागतिक स्तरावर दरवर्षी 8 मार्च रोजी महिलांच्या सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक आणि राजकीय कामगिरीचा उत्सव साजरा करण्यासाठी साजरा केला जातो. तसेच, लिंग समानतेचे महत्व पटवून देण्यासाठीदेखील हा दिवस साजरा केला जातो. जागतिक महिला दिन हा दिवस आज जरी समाजात महिलांचा सत्कार करून साजरा केला जात असला तरी, हा दिवस उजाडण्यामागे एक इतिहास आहे. हा इतिहास नेमका काय? महिला दिन का साजरा केला जातो आणि याचं महत्त्व काय ते समजून घेणं गरजेचे आहे.
संपूर्ण अमेरिका आणि युरोपसहित जवळजवळ संपूर्ण जगभरातील स्त्रियांना विसाव्या शतकाच्या सुरूवातीपर्यंत मतदानाचा हक्क नाकारलेला होता. या अन्यायाविरुद्ध स्त्रिया आपापल्या परीने संघर्ष करीत होत्या. 1890 मध्ये अमेरिकेत मतदानाच्या हक्कासंदर्भात `द नॅशनल अमेरिकन सफ्रेजिस्ट असोसिएशन' स्थापन झाली. परंतु ही असोसिएशनसुद्धा वर्णद्वेषी आणि स्थलांतरितांविषयी पूर्वग्रह असणारी होती.
महिला दिनाचा इतिहास :
8 मार्च 1908 रोजी न्यूयॉर्कमध्ये वस्त्रोद्योगातील हजारो स्त्री-कामगारांनी रुटगर्स चौकात एकत्र येऊन प्रचंड मोठी ऐतिहासिक निदर्शने केली. दहा तासांचा दिवस आणि कामाच्या जागी सुरक्षितता या मागण्या केल्या. या दोन मागण्यांबरोबरच लिंग, वर्ण, मालमत्ता आणि शैक्षणिक पार्श्वभूमीनिरपेक्ष सर्व प्रौढ स्त्री-पुरुषांना मतदानाचा हक्क मिळावा अशी मागणीही केली. अमेरिकन कामगार स्त्रियांच्या या व्यापक कृतीने क्लारा झेटकिन अतिशय प्रभावित झाली. 1910 साली कोपनहेगन येथे भरलेल्या दुसऱ्या आंतरराष्ट्रीय समाजवादी महिला परिषदेत, 8 मार्च 1908 रोजी अमेरिकेतील स्त्री-कामगारांनी केलेल्या ऐतिहासिक कामगिरीच्या स्मरणार्थ, 8 मार्च हा `जागतिक महिला-दिन' म्हणून स्वीकारावा हा क्लारा यांनी मांडलेला ठराव पास झाला.
भारतात मुंबई येथे पहिला महिला दिवस 8 मार्च 1943 रोजी साजरा करण्यात आला. 8 मार्च 1971 ला पुण्यात एक मोठा मोर्चा काढण्यात आला होता. पुढे 1975 हे वर्ष युनोने `जागतिक महिला वर्ष' म्हणून जाहीर केले. त्यानंतर स्त्रियांच्या समस्या ठळकपणे समाजासमोर येत गेल्या. स्त्रियांच्या संघटनांना बळकटी आली. बदलत्या सामाजिक, आर्थिक, राजकीय, सांस्कृतिक परिस्थितीनुसार काही प्रश्नांचे स्वरूप बदलत गेले तशा स्त्री संघटनांच्या मागण्याही बदलत गेल्या. आजच्या काळात जागतिक महिला दिन सर्वत्र साजरा करताना दिसून येतो. .
1975 या जागतिक महिला वर्षाच्या निमित्ताने संयुक्त राष्ट्र संघटनेने आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा करण्याचे ठरविले. 1977 साली संयुक्त राष्ट्र संघटनेच्या समितीने विविध सदस्यांना आमंत्रित करून 8 मार्च हा आंतरराष्ट्रीय स्तरावर महिलांचे अधिकार आणि जागतिक शांतता या हेतूने साजरा करावा यासाठी आवाहन केले. आणि त्यानुसार संपूर्ण जगभरात आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा केला जातो.
महिलांच्या हक्काचा दिवस म्हणजेच 'जागतिक महिला दिन
|