बातम्या
महिलांचे आरोग्य हे निरोगी समाजाची गुरुकिल्ली : आमदार जयश्री जाधव
By nisha patil - 5/3/2024 3:31:42 PM
Share This News:
महिलांचे आरोग्य हे निरोगी समाजाची गुरुकिल्ली : आमदार जयश्री जाधव
जयश्री चंद्रकांत (आण्णा) जाधव फाउंडेशनतर्फे झुंबा मेळाव्याचे आयोजन : महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
कोल्हापूर : निरोगी मन आणि शरीर असलेली महिला कुटुंबाच्या आरोग्यासाठी सर्वाधिक सतर्क असतात. त्यामुळे महिलांचे आरोग्य हे निरोगी समाजाची गुरुकिल्ली आहे, असे मत आमदार जयश्री चंद्रकांत जाधव यांनी व्यक्त केले.
जयश्री चंद्रकांत (आण्णा) जाधव फाउंडेशनतर्फे आयोजित झुंबा मेळाव्याच्या उद्घाटन प्रसंगी त्या बोलत होत्या अध्यक्षस्थानी फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉ. दश्मिता सत्यजित जाधव होत्या.
झुंबा हा लॅटिन अमेरिकन नृत्य प्रकार असून, संगीत आणि ग्रुप एक्सरसाइझमुळे तरुण व महिला वर्ग झुम्बाकडे आकर्षित झाले आहेत. महिलांना शास्त्रशुद्ध झुंबाचे प्रशिक्षण मिळावे, या उद्देशाने झुंबा मेळाव्याचे आयोजन केले होते. यास महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
जयश्री जाधव म्हणाल्या, स्त्रीने आपल्या शारीरिक तसेच मानसिक आरोग्यासाठी वेळ देणे खूप महत्त्वाचे आहे. संध्याकाळी दोन तास सहजच व्हॉट्सऍप बघण्यात जातात, त्याऐवजी योगा, मेडिटेशन आणि व्यायामासाठी वेळ द्या, पुस्तके वाचा. त्यामुळे संपूर्ण परिवाराला एक चांगली सवय लागेल.
अनेकांना व्यायाम करायला आवडत नाही. अशा लोकांसाठी झुंबा हा एक रोमांचकारी आणि उत्तम व्यायाम प्रकार आहे. त्यामुळेच महिलांना शास्त्रशुद्ध झुंबाचे प्रशिक्षण मिळावे, या उद्देशाने झुंबा मेळाव्याचे आयोजन केल्याचे फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉ. दश्मिता सत्यजित जाधव यांनी सांगितले.
मेळाव्याच्या प्रारंभी दिवंगत आमदार चंद्रकांत जाधव (आण्णा) यांच्या प्रतिमेला अभिवादन करण्यात आले. यावेळी झुंबा ट्रेनर शुभांगी पाटील यांनी महिलांना मार्गदर्शन केले. तसेच महिलांनी झुंबा नृत्याचा मनमुराद आनंद लुटला.
यावेळी दिपाली घाटगे, जयश्री घोलप, पूजा आरडे, संध्या सूर्यवंशी, वैशाली जाधव, पद्मिनी माने, उज्वला चौगुले, वैशाली भोसले यांच्यासह मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या.
यावेळी महिलांच्या साठी व्यायामानुसार घेण्यात आलेल्या विविध स्पॉट गेम मधील विजेते असे : पद्मजा घाटगे, सुनिता चौधरी, रेखा गोठडकी, स्मिता गुंदेशा, कृती जाधव, वैष्णवी मांगोरे.
महिलांचे आरोग्य हे निरोगी समाजाची गुरुकिल्ली : आमदार जयश्री जाधव
|