बातम्या

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या धर्तीवर कोल्हापुरात महिलांचा मेळावा

Womens meeting in Kolhapur on the lines of Chief Ministers beloved sister scheme


By nisha patil - 3/9/2024 9:37:24 PM
Share This News:



कोल्हापूर, दि. २० : एक महिला संपूर्ण कुटुंबाची सूत्रे चालवीत असते. महिला सक्षम झाली तर संपूर्ण कुटुंब सक्षम होते. त्यामुळे महिलांना सक्षम करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडकी बहिण, अन्नपूर्णा, मुलीना मोफत शिक्षण अशा अनेक हितकारक योजना राबविल्या आहेत. पण या योजनांना बदनाम करण्याचे काम विरोधक करत आहेत. योजना यशस्वी झाली, बहिणींच्या बँक खात्यावर पैसे जमा झाले याचे पोटशूळ विरोधकांना उठले असून, यापूर्वीच्या मुख्यमंत्र्यांनी माझे कुटुंब माझी जबाबदारी योजना राबविली पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची महाराष्ट्र माझे कुटुंब अशी कार्यपद्धती असल्याचे प्रतिपादन शिवसेना संसदीय गटनेते खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांनी केले.

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या धर्तीवर कोल्हापुर शहरातील महिलांचा मेळावा अभिषेक लॉन, जुना बुधवार पेठ येथे पार पडला. या मेळाव्यास महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. उपस्थित महिला भगिनींनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विजयाच्या घोषणा देवून मेळावा परिसर दणाणून सोडला.

यावेळी बोलताना खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांनी, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी समाजातील सर्वच घटकांसाठी महत्त्वपूर्ण योजनांद्वारे योगदान दिले आहे. शेतकरी, कष्टकरी, व्यापारी, महिला, विद्यार्थी, कामगार या सर्वांनाच न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. राज्यातील माता भगिनींचे सशक्तीकरण करण्यासाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची नुसती घोषणाच केली नाहीत तर ती अंमलात आणून राखीपौर्णिमेपूर्वीच लाखो भगिनींच्या बँक खात्यावर रक्कम जमा केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महिलांना सक्षम करण्याचे काम केले. त्यामुळे विरोधक धास्तावले आहेत. चुकीचा प्रचार करून गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे आता बहिणींनी त्यांचे लाडके भाऊ ठरलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पाठीशी उभे राहावे, असे आवाहन केले.

यावेळी बोलताना राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर यांनी, ज्या महिलांचे अर्ज प्रलंबित आहेत त्यांच्याही खात्यावर लवकरच पैसे जमा होतील. ज्यांनी अर्ज केले नाहीत त्यांनी लवकरात लवकर अर्ज करावेत त्यांनाही योजनेचा लाभ शासन देणार आहे. ही योजना १०० टक्के यशस्वी होणार असल्याचे सांगितले.

योजनेच्या आड येणाऱ्या नाटाळांच्या मस्तकी गदेचा टोला द्या; शिवसेना महिला आघाडीकडून खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांचा चांदीची गदा देवून स्वागत

राज्यातील माता भगिनींसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना यशस्वीरित्या राबविली आहे. या योजनेबद्दल महिलांमधून आनंद व्यक्त करण्यात येत आहे. याबद्दल प्रथमत: मुख्यमंत्री साहेबांचे आभार. राज्यातील लाखो भगिनींचे लाडके भाऊ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांचे सुपुत्र व शिवसेनेचे संसदीय गटनेते खासदार श्रीकांत शिंदे या राज्यातील माताभगिनींच्या लाडक्या भाच्याला आम्ही ही श्री हनुमानाची गदा आज भेट देत आहोत. आमच्या लाडक्या भाच्याला सांगत आहोत कि अशा जनकल्याणकारी योजनांच्या आडवे जे नाकर्ते सावत्र भाऊ येतात त्या  नाटाळांच्या मस्तकी गदेचा टोला द्या, आम्ही सर्वजणी आपल्या पाठीशी आहोत, असे सांगत शिवसेना महिला आघाडीकडून खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांचे स्वागत करण्यात आले.  

    या मेळाव्यास खासदार धैर्यशील माने, माजी खासदार राहुल शेवाळे, जिल्हाप्रमुख सुजित चव्हाण, देवस्थान समितीच्या माजी कोशाध्यक्षा सौ.वैशाली क्षीरसागर, महिला आघाडी शहरप्रमुख सिद्धी रांगणेकर, शहरप्रमुख अमरजा पाटील, समन्वयक पूजा भोर, युवती सेना शहरप्रमुख नम्रता भोसले, मंगलताई कुलकर्णी, पूजा कामते, गौरी माळदकर, गीता भंडारी, पूजा पाटील, सुनिता भोपळे यांच्यासह महिला आघाडीच्या पदाधिकारी उपस्थित होत्या.


मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या धर्तीवर कोल्हापुरात महिलांचा मेळावा