बातम्या

हिवाळ्यात राज्यात दोन दिवस पावसाचा यलो अलर्ट

Yellow alert for two days of rain in the state in winter


By nisha patil - 9/1/2024 1:27:51 PM
Share This News:



राज्यात हिवाळ्यात पावसाचा यलो अलर्ट मिळाला आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या रब्बी पिकांचे नुकसान होणार आहे. मंगळवारी धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यास पावसाचा यलो अलर्ट दिला आहे तर बुधवारी धुळे, जळगाव, नाशिक, नगर जिल्ह्यास पावसाचा यलो अलर्ट हवामान विभागाने दिला आहे. या भागांत विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. तसेच पुणे, सातारा, छत्रपती संभाजीनगर, जालना या भागांत पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. यंदा पावसाने राज्यात सरासरी गाठली नव्हती. कमी पावसामुळे राज्यातील धरणांमध्ये पुरेसा जलसाठाही नाही. त्यामुळे यंदा रब्बीची लागवड कमी झाली आहे. आता अवकाळीचा फटका पुन्हा शेतकऱ्यांना बसणार आहे.

कोकणात पावसाला सुरुवात
रत्नागिरीसह कोकणातील काही भागांत पावसाला सुरुवात झाली आहे. रत्नागिरी परिसरात मघ्यरात्री अवकाळी पाऊस झाला. विजांच्या कडकडाटासह अर्धातास पावसाने दमदार हजेरी लावली. पावसामुळे अनेक भागातील वीज पुरवठा ही खंडीत झाला होता. लांजा शहरात अजूनही वीज पुरवठा सुरळीत नाही. मंगळवारी देखील दिवसभरात अवकाळी पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. रत्नागिरीत सकाळपासून ढगाळ वातावरण आहे.

सोलापूर जिल्ह्यात अवकाळी पावसाची हजेरी
सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यात अवकाळी पावसाची हजेरी लावली. गेल्या दोन दिवसांपासून शहर आणि जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात गारवा निर्माण झाला आहे. परंतु अवकाळी पावसामुळे ज्वारी, द्राक्षे, कांदा, अशा अनेक पिकांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. यंदाच्या वर्षी दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकरी चिंतेत असताना आता पुन्हा एकदा अवकाळी पावसाच्या निमित्ताने शेतकऱ्यांसमोर मोठे संकट निर्माण झाले आहे.


हिवाळ्यात राज्यात दोन दिवस पावसाचा यलो अलर्ट