योग आणि मानसशास्त्र

Yoga and Psychology


By nisha patil - 5/31/2023 8:43:32 AM
Share This News:



भारतीय तद्वज्ञानामध्ये अर्थात भारतीय आध्यात्मिक परंपरेमध्ये योगाला अनन्यसाधारण असे महत्व आहे. योगाचा विचार करताना प्रथमतः केवळ आसनांचा विचार केला जातो परंतु मानसशास्त्राच्या दृष्टिकोनातून विचार केल्यास योग हे आसनांच्याही पलीकडे आहे. आसनांमुळे आपण शरीरावर नियंत्रण आणू शकतो किंवा शरीराचे नियमन अधिक चांगल्या प्रकारे करू शकतो.(उदा. आहार, विहार, निद्रा इत्यादी ).  त्यामुळेच शरीर आणि मन यातील दुवा म्हणजे योग असे म्हटले जाते. आणि या गोष्टी नियमितपणे सर्व करणे म्हणजेच विचार, भावना आणि वर्तन यामध्ये एकसूत्रीपणा आणणे.ज्याचे विचार, भावना आणि वर्तन हे स्वतःच्या नियंत्रणात आहे ते सुदृढ मानसिक आरोग्याचे एक लक्षण आहे.
    आसनांव्यतिरिक्त योगिक जीवन शैलीचा किंवा योगिक घटकांचा जर आपण विचार केला तर  योगशी संबंधित प्रत्येक कृती मानवी मनाला आणखी समृद्ध करते असे आपल्याला जाणवेल. उदाहरणार्थ प्राणायाम, योगनिद्रा, मंत्रजप, सात्विक आहाराचे सेवन, ज्ञान योग, भक्ती योग, आणि कर्म योग. 
    प्राणायामाच्या नियमित अभ्यासाने अनेक शारीरिक विकार दूर होतातच शिवाय प्राणायाम केल्यामुळे सकारात्मक विचारसरणीला चालना मिळते. उत्साह वाढतो. आणि वाचेसंबंधी अनेक दोष दूर होतात. तोतरे बोलणे, अडखळत बोलणे, अस्पष्ट बोलणे इत्यादी वाचेसंबंधी अनेक अडचणींवर प्राणायामाचा फायदा दिसून येतो.
    आहार आणि मानसिकता ह्या अगदी एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. जसे आपले अन्न असेल तशी आपली वासना (इच्छा, विचार, भावना, हेतू, गरज) बनते. त्यामुळेच सात्विक आहाराला योग मध्ये महत्व आहे. सात्विक आहारामुळे मानसिक प्रसन्नता राहते, मनातील विकार कमी होतात, आणि शारीरिक कार्यांना स्थूलता येत नाही. सात्विक आहारामुळे सद्वासना  (इच्छा, विचार, भावना, हेतू, गरज) तयार होतात. अशा सद्वासना आपल्याला आपल्या ध्येय प्राप्तीसाठी फार साहाय्यक असतात, कारण आहारामुळे निद्रा आणि वर्तन आपोआप नियंत्रणात येते. तसेच आहाराचे सेवन करत असताना जर आपण शक्य तितके मौन पाळण्याचा प्रयत्न केला तर एकीकडे अन्नसेवन होते आणि दुसरीकडे आत्मचिंतन म्हणजेच आत्मपरीक्षण होते. शांततेत भोजन केल्यास आपण खऱ्या अर्थाने अंतर्मुख होतो आणि मानसिक विकास होण्यास अधिक मदत मिळते.
    ज्ञानयोग म्हणजे थोडक्यात विवेक आणि वैराग्य यातील फरक समजून घेणे. ज्या गोष्टी आपल्याला आपल्या ध्येय प्राप्तीला पूरक ठरतात अशा गोष्टींची कास धरणे म्हणजे विवेक आणि ज्या गोष्टी आपल्याला आपल्या ध्येय प्राप्तीच्या आड येतात अशा गोष्टी बाजूला सारणे याचे नाव विवेक. मानसशास्त्रामध्ये ज्ञान म्हणजे आपले विचार, स्मृती, दृष्टिकोन, अवधान, एकाग्रता, समस्या परिहाराची क्षमता, सृजनशीलता इत्यादी होय. झा ह्या सगळ्या मानसिक क्रिया आपण एका ठराविक उद्दिष्टाला अनुसरून करतो आणि त्यामध्ये आपण केवळ आपला विचार न करतात समाजाचाही विचार करतो तो खऱ्या अर्थाने आणि व्यापक अर्थाने ज्ञानयोग होय.
    भक्ती योग म्हणजे मानशास्त्रातील भावना. आपण आपल्या भावना ओळखणे, तसेच समोरच्या व्यक्ती भावना ओळखणे,  आपल्या भावना व्यक्त करणे आणि त्या भावना व्यक्त करत असताना स्वतःशी आणि इतरांशी प्रामाणिक असणे असे होय. केवळ विचार समजून किंवा बदलून वर्तनामध्ये बदल होतो असे नाही. जेव्हा आपण केलेला विचार (विवेक आणि वैराग्य) आपल्याला  मनापासून पटेल तेव्हा खऱ्या अर्थाने आपल्या कृतीत बदल होईल.
    कर्म योग म्हणजे आवश्यक आहे ते कार्य करणे आणि ते कार्य करत असताना त्या कार्याच्या परिणामाचा विचार न करणे. ह्या साठी विवेकनिष्ठ मानसोपचार तंत्रातील  दोन संकल्पना अतिशय उपयुक्त आहे. एक म्हणजे नियंत्रणातील घटक- म्हणजे आपण करत असलेल्या कार्यात असे कोणते घटक आहेत कि जे आपल्या नियंत्रणात आहे (उदा: विद्यार्थ्यांसाठी- अभ्यास करणे, नोट्स काढणे, शिक्षकांशी चर्चा करणे, सर्व करणे इत्यादी नियंत्रणातील घटक). आणि दुसरा घटक म्हणजे नियंत्रणाबाहेरचे घटक म्हणजे ज्या घटकांवर आपले कमी किंवा काहीही नियंत्रण नाही असे घटक. (उदा: विद्यार्थ्यांसाठी ‘पेपर/ परीक्षा कशी असेल, निकाल कधी आणि कसा लागेल इत्यादी नियंत्रणाबाहेरचे घटक). व्यक्ती जितका नियंत्रणातील घटकांचा विचार करेल तितका तो त्याच्या कार्यात अधिक गुणवत्तापूर्ण कार्य करू शकेल पण जर नियंत्रणाबाहेरील  घटकांवर जास्त भर दिला तर चिंता, नैराश्य, ताण- तणाव, क्रोध इत्यादी मानसिक अस्वस्थता सुरु होतात.
    त्यामुळे योग आणि मानसशास्त्र म्हणजे थोडक्यात सांगायचे झाले तर “योगः कर्मसु कौशलम”. 


योग आणि मानसशास्त्र