बातम्या

आजपासून  कोल्हापुर जिल्हयात भ्रष्टाचाराविरुद्ध जनजागृती मोहीम सुरू

anticourruption janjagruti mohim


By Administrator - 10/30/2023 1:07:45 PM
Share This News:



आजपासून  कोल्हापुर जिल्हयात भ्रष्टाचाराविरुद्ध जनजागृती मोहीम सुरू

  ३० ऑक्टोबर ते ५ नोव्हेंबर दरम्यान दक्षता जनजागृती सप्ताह साजरा

जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांच्या उपास्थितीत सर्व जिल्हा प्रशासनाने घेतली शपथ

  'जीवनाच्या सर्व क्षेत्रात सच्चेपणा आणि कायद्याचे पालन करेन. लाच घेणार नाही आणि लाच देणार नाही. सर्व कामे प्रामाणिकपणे आणि पारदर्शक पद्धतीने करेन. जनहितासाठी कार्य करेन', अशी प्रतिज्ञा घेऊन भ्रष्टाचाराविरुद्ध जनजागृती करण्याच्या उद्देशाने सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत ताराबाई सभागृह मध्ये 'दक्षता जनजागृती सप्ताहा'चा प्रारंभ करण्यात आला.

 
सालाबादप्रमाणे  ३० ऑक्टोबर ते ५ नोव्हेंबर दरम्यान दक्षता जनजागृती सप्ताह साजरा केला जातो. कोल्हाूरमधील लाचलुचपत विभागाच्या वतीने आय.ई.सी. रथ तयार केला असून त्याद्वारे  लाचलुचपत विभागाकडे तक्रार कशी द्यावी याबाबत वारंवार विचारणारे जाणाऱ्या प्रश्नांची माहिती व त्याचे उत्तरे देण्यात आली आहेत. तसेच हा चित्ररथ कोल्हापूर जिल्ह्यातील बारा तालुक्यांमध्ये विविध जत्रा, यात्रा मोठे बाजार अशा पद्धतीने गावोगावी जाऊन जनजागृती करणार आहे. त्या गाडीवरती जनजागृतीपर जिंगल्सही वाजविल्या जाणार आहेत. तसेच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने रेडिओ एफएम द्वारे जिल्ह्यात वेगवेगळ्या प्रकारे जनतेला भ्रष्टाचार निर्मूलन बाबत आवाहनही करण्यात येत आहे.

सार्वजनिक जीवनात प्रामाणिकपणा आणि सत्यनिष्ठा याबद्दलच्या दृढनिश्चयाचे बळकटीकरण करण्यासाठी नागरिकांच्या सहभागाने हा सप्ताह साजरा करण्यात येतो. यावेळी सप्ताहाचे बोधवाक्य 'भ्रष्टाचाराला नाही म्हणा, राष्ट्रासाठी वचनबध्द व्हा' असे आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने यावर्षी सरकारी व निमसरकारी कार्यालयात दक्षता जनजागृती सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. या सप्ताहासाठी ६ जणांची टीम सर्व विभागात जावून हॅण्डबील वाटप करून, नागरिकांना भेटून भ्रष्टाचार निर्मूलन बाबत माहिती देणार आहेत. विभागाच्या भ्रष्टाचार निर्मूलन मोहिमेत नागरिकांनी देखील सहभागी होऊन, लाचेची मागणी करणाऱ्यांची माहिती विभागाला द्यावी, असे अवाहन कोल्हापूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. तसेच लाच विरोधी तक्रार देण्यासाठी कार्यालयात येण्याची गरज नाही, तक्रारदार मोबाईल द्वारे मला 9673506555 क्रमांकावर माहिती व तक्रार देवू शकतात असे आवाहन पोलीस उप अधीक्षक सरदार नाळे यांनी केले आहे.


शालेय विद्यार्थ्यांसाठी भ्रष्टाचार निर्मूलन या विषयावर आधारित निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. शिक्षण विभाग प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक यांना याबाबत माहिती दिली आहे. या स्पर्धेत विजयी विद्यार्थ्यांना बक्षिसांचे वाटपही करण्यात येणार आहे.

 जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी उपस्थित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांबरोबर भ्रष्टाचार निर्मूलनाची शपथ घेतली. यावेळी अपर जिल्हाधिकारी संजय शिंदे, लाचलूचपत विभागाचे पोलीस उप अधीक्षक सरदार नाळे, उपजिल्हाधिकारी संपत खिलारी, उपजिल्हाधिकारी अश्विनी जिरंगे, उपजिल्हाधिकारी विवेक काळे, उपजिल्हाधिकारी समाधान शेंडगे, जिल्हा प्रशासन अधिकारी नरेंद्र मुतकेकर, जिल्हा नियोजन अधिकारी विजय पवार, तहसीलदार स्वप्नील पवार हे उपस्थित होते.


आजपासून  कोल्हापुर जिल्हयात भ्रष्टाचाराविरुद्ध जनजागृती मोहीम सुरू