बातम्या
महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या मुख्य सरव्यवस्थापक पदी डाॅ. ए. बी. माने यांची निवड
By nisha patil - 6/30/2023 5:29:26 PM
Share This News:
कोल्हापूर, दि. २९: महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या मुख्य सरव्यवस्थापक पदी डाॅ. ए. बी. माने यांची निवड झाली. डॉ. श्री. माने सध्या कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. देशातील सर्वात मोठी राज्य सहकारी बँक असा लौकिक असलेल्या एमएससी बँकेवर जिल्हा सहकारी बँकांच्या अधिकाऱ्यांमधून मुख्य सरव्यवस्थापक पदी निवड होणारे डॉ. श्री. माने हे पहिलेच अधिकारी आहेत. आतापर्यंत त्यांनी राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर जिल्हा बँकेचे प्रतिनिधित्व केले आहे. बँकेने प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून प्रशासन व बोर्ड विभागाची व्यवस्थापक जी. एम. शिंदे यांच्याकडे कार्यभार सोपविला आहे.
बँकेचे अध्यक्ष आमदार हसन मुश्रीफ यांच्या हस्ते कार्यकारी समितीच्या बैठकीत श्री. माने यांना शुभेच्छा देण्यात आल्या व येत्या संचालक मंडळाच्या बैठकीत त्यांचा यथोचित गौरव केला जाणार आहे.
रिझर्व बँक व नाबार्डच्या तज्ञ अधिकाऱ्यांच्या पॅनेलने मुलाखती घेऊन श्री. माने यांची निवड निश्चित केली आहे.
उच्च विद्या विभूषित असलेले श्री. माने यांनी पुणे येथील कृषी महाविद्यालयातून कृषी पदवीधर झाल्यानंतर त्यांनी धारवाडच्या कृषी विद्यापीठातून पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. राहुरी येथील महात्मा कृषी फुले कृषी विद्यापीठामध्ये त्यांनी कृषी अर्थशास्त्र या विषयात पीएच.डी. केली आहे. रिझर्व बँकेच्या पुणेस्थीत कॉलेज ऑफ ॲग्रीकल्चर बँकिंगमधून त्यांनी 'ग्रामीण विकास प्रकल्प' ही पदविकाही घेतलेली आहे.
रिझर्व बँकेने बँकिंग क्षेत्रातील संशोधन व प्रशिक्षणासाठी स्थापन केलेल्या पुणे येथील राष्ट्रीय बँकिंग प्रबंधन संस्थेमध्ये त्यांनी संशोधन अधिकारी म्हणून काम केले आहे. मुंबईतील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग या संस्थेचे ते सर्टिफाईड असोसिएट आहेत. गुजरातमधील अहमदाबाद येथील व्यावसायिकता विकास संस्थेमध्ये त्यांनी फॅकल्टी म्हणूनही काम केले आहे.
गेल्या २५ वर्षात कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये त्यांनी विविध पदांवर सेवा बजावली आहे. कृषी अधिकारी, बीडीएस विभागामध्ये प्रकल्प अधिकारी, सीएमए सेलचे उपव्यवस्थापक, तसेच अकाउंट्स बँकिंग, शेती कर्जे, प्रशासन, सीएमए सेल, वसुली, ऑडिट, माहिती तंत्रज्ञान या विभागांचे व्यवस्थापक अशा विविध विभागात वरिष्ठ पदांवर काम केले आहे. २०१४ मध्ये प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी व २०१८ पासून नियमित मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून त्यांची निवड झाली. ३१ मार्च २०२३ रोजी वयाची ५८ वर्षे पूर्ण झाल्यानंतर बँकेने त्यांना दोन वर्षांची मुदतवाढ दिली होती.
डॉ. श्री. ए. बी. माने यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, १९९७ साली विद्यमान अध्यक्ष आमदार हसनसाहेब मुश्रीफ अध्यक्षपदी असताना या बँकेतील सेवेसाठी लेखी व तोंडी परीक्षा दिली होती. त्यावेळी गुणवत्तेनुसार अध्यक्ष श्री. मुश्रीफसाहेब व संचालक मंडळांने मला बँकेच्या सेवेमध्ये सामावून घेतले. अशाप्रकारे या बँकेमध्ये काम करण्याची संधी दिल्यामुळेच आज शिखर बँकेमध्ये काम करण्याची संधी मिळाली.
महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या मुख्य सरव्यवस्थापक पदी डाॅ. ए. बी. माने यांची निवड
|