बातम्या

मायेची भूक अजून तशीच....

hunger is still the same


By nisha patil - 1/29/2024 8:03:17 AM
Share This News:




प्रिय आईस,
 
पत्ता: देवाचे घर,
 
तुझा हात हवा होता
सदा माझ्या उश्यावर,थोपटून मला झोपवायला
अचानक जाग आल्यावर.
 
मी अजून सुद्धा दचकून
जागा होतो मधिच,
 
तुझी काळजी रात्रभर       
सतावत राहते उगीच.
 
तू का इतक्या लवकर
सोडून गेलीस गाव माझं,'आईविना पोर' असं
घेतात लोकं नाव माझं.
 
वरवरच्या पदार्थांची मला
चवच लागत नाही,काय करू तुझ्या दुधाविना माझी भूकच भागत नाही.
 
पोरकेपणाची माझ्या भोवती
का ठेऊन गेलीस जाळ,
 
का खरंच इतकी कच्ची
होती, तुझ्या माझ्यातली नाळ.
 
तिथं कुणी आहे तुझ्याशी
बोलायला भरपूर,
 
उगाच रडत राहू नकोस
दाबून स्वतःचा  ऊर.
 
बघ आई आता मी
रडत नाही पडलो तरी,
 
मला ठावूक आहे तू
गेली आहेस  देवाघरी. 
 
भूक लागली तरी
बिलकूल मी रडत नाही,
 
कारण मी हसल्या शिवाय
तुला चैन पडत नाही.
 
पण रोज रात्र झाली कि तुझ्या आठवणींचा थवा येतो,
अंथरुणात लपून,  पुसून डोळे, मी गप्प झोपी जातो.
 
बघ तुझं बाळ किती
समजूतदार झालं आहे,
 
आणि वय कळण्याआधी   
वेडं वयात आलं आहे.
 
अजिबात म्हणजे अजिबात
त्रास देत नाही पप्पाला,
 
तुझी काळजी तेवढी मात्र घ्यायला सांग बाप्पाला.
 
आणि सांग कि
हे शहाण बाळही आहे हट्टी,
जर का काही झालं तुला तर घेईल म्हणावं कट्टी.
 
मी आता थकलोय
तुला ढगांमध्ये पाहून,
 
ये आता भेटायला      
नजर तिथली चुकवून.
 
जमलं जर का सुट्टी घ्यायला
तर ये निघून अशीच,
             
पोट भरतं ग रोज
पण मायेची भूक अजून तशीच....
             
मायेची भूक अजून तशीच....
मायेची भूक अजून तशीच....


मायेची भूक अजून तशीच....