बातम्या
स्वामी विवेकानंदांचे शिक्षण विचार
By nisha patil - 11/7/2023 7:19:45 AM
Share This News:
भारतीय आध्यात्म आणि तत्त्वज्ञानाची समग्र ओळख समर्थपणे संपूर्ण जगाला स्वामी विवेकानंद यांनी करून दिली. मानवी धर्माचे सहजसरळ विश्लेषण त्यांनी आपल्या अनेक रसाळ भाषणं आणि लेखनातून केले आहे. याबरोबरच मानवी जीवनात विकासासाठी शिक्षणाचे महत्त्व, शिक्षणाचे तत्त्वज्ञान राष्ट्रनिर्मितीसाठी किती महत्त्वपूर्ण आहे, हे सुद्धा पटवून दिले आहे. 'दुसऱ्यांच्या काही गोष्टी परक्या भाषेमध्ये पाठ करून मेंदूत अगदी कोंबून परीक्षा देता व पास झाल्यावर मानू लागला की आपण शिक्षित झालो याला का शिक्षण म्हणायचे?,' अत्यंत तिरस्काराने आणि परखडपणे प्रचलित शिक्षणासंबंधी स्वामी विवेकानंदांनी आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या आहेत. शिक्षण म्हणजे मनुष्याच्या ठिकाणी जे पूर्णत्व आधीचेच विद्यमान आहे, त्याचे प्रकटीकरण अशी पायाभूत संकल्पना स्पष्ट करून त्यांनी शिक्षणाचे महत्त्व विशद केले आहे.संपूर्ण शिक्षणाचे ध्येय माणूस निर्माण करणे होय. ज्ञानप्राप्तीच्या काही मूलभूत आणि महत्त्वपूर्ण तत्त्वांची मिमांसा स्वामी विवेकानंद यांनी केली आहे. ज्ञानसाधनेची एकमेव रीत म्हणजे एकाग्रता होय हे सांगत असतांनाच ही एकाग्रताच ज्ञानाची एकमात्र गुरुकिल्ली होय, मनाच्या या एकाग्रतेसाठी ब्रह्मचर्य अत्यंत आवश्यक असल्याचे प्रतिपादन स्वामी विवेकानंद यांनी केले आहे. ब्रह्मचर्य पालनामुळेच असामान्य बौद्धिक व आत्मिक शक्तीचा अविष्कार होतो. विचार, उच्चार आणि आचार याबाबतीत सदासर्वकाळ सर्व प्रकारच्या अवस्थेत पावित्र्य टिकविणे म्हणजेच ब्रह्मचर्य होय, हे पण स्पष्ट करण्यात आले आहे. मनुष्याच्या विकासाचे मुळ श्रद्धा होय, हे विशद करताना स्वामी विवेकानंदांनी आपल्या जीवनाचे ध्येय पुढील शब्दात स्पष्ट केले आहे.श्रद्धेचा किंवा खऱ्या विश्वासाचा प्रचार हेच माझ्या जीवनाचे ध्येय. मनुष्याचा विकास हेच शिक्षणाचे ध्येय असते अर्थात यामध्ये श्रद्धा आणि विश्वासाचे स्थान महत्त्वपूर्ण असतेच असते. मनुष्याचे शील आणि चरित्र्य निर्माण हे शिक्षणाचे महत्त्वाचे तत्त्व होय. मनुष्याच्या प्रवृत्ती आणि संस्कार मनुष्याच्या चारित्र्य निर्मितीसाठी अत्यावश्यक असतात. त्याच्या प्रवृत्ती आणि संस्कार त्याच्या व्यक्तिमत्त्वाच्या सवयी आणि स्वभाव बनतात. शिक्षणाद्वारे मनुष्याच्या व्यक्तिमत्त्वात अशा प्रवृत्ती आणि संस्कार अनायास निर्माण झाल्या पाहिजेत, असे स्वामी विवेकानंदांचे आग्रही प्रतिपादन आहे. अशा सर्व प्रवृत्ती आणि संस्कारामधून मानवी जीवनाचे कल्याण साध्य करण्याची इच्छाशक्ती प्रबळ असणे हे शिक्षणाचे सर्वार्थाने ध्येय होय.
शिक्षणाचे सर्वार्थाने ध्येयाचे विवेचन करून स्वामींनी मनुष्याच्या व्यक्तिमत्त्वाचा विकास साधण्यासाठी पुढील बाबींचा उल्लेख केला आहे. गुरु-शिष्य संबंधांची चर्चा करतांना त्यांनी गुरूगृहवास ही त्यांची शिक्षणाची कल्पना असून शिक्षक चारित्र्यवान असल्या खेरीज कोणत्याही प्रकारचे शिक्षण होते शक्य नाही, हे स्पष्ट केले. शिष्याच्या बाबतीत पावित्र्य, ज्ञानोपार्जनाची खरी तृष्णा व चिकाटी हे गुण आवश्यक आहेत. गुरूला शास्त्रांचे मर्म अवगत असणे महत्त्वाचे असून पापशून्यता ही दुसरी आवश्यक गोष्ट आहे. शेवटी शिक्षकाने पैसा किंवा नाव लौकिक या सारख्या अन्य स्वार्थी हेतूने शिक्षणाचे काम करू नये, हे स्पष्ट केले आहेस्वामी विवेकानंदांच्या मते धर्म हा शिक्षणाचा गाभा होय. धर्माची संकुचित व्याख्या नव्हे, तर एका व्यापक धर्माची व्याख्या प्रस्तुत केली आहे. धर्म म्हणजे अनंत बल, बल म्हणजेच पुण्य, दुर्बलता म्हणजेच पाप अशा सहजसोप्या अध्यात्म संकल्पनातून त्याचे मानवी जीवनातील महत्त्व विशद केले आहे. शिक्षणात साध्य आणि साधन यांचा विचार करताना साध्य इतकेच साधनेकडे लक्ष देणे महत्त्वाचे आहे. एकदा ध्येय ठरविले आणि त्याची साधने निश्चित केली म्हणजे ध्येयाचा विचार सोडून दिला तरी हरकत नसल्याचे ते मानत असत.
'स्त्री-शिक्षणाचे महत्त्व विशद करताना स्वामींनी हे स्पष्ट केले आहे की स्त्रियांचे जीवन विषादमय असेल, तर कोणत्याही कुटुंबांची वा देशाची उन्नती होण्याची आशाच नको,' स्त्री जाती पुढील अनेक गंभीर प्रश्न शिक्षणाने सहज सुटू शकतील, असा स्वामींचा विश्वास आहे. सर्वसाधारण समाजाचे शिक्षण आवश्यक आहे, याकडे दुर्लक्ष हेच आपले राष्ट्रीय पातक असून घोर अध:पतनाचे मूळ कारण आहे, अशी अवस्था पाहून स्वामी विवेकानंदांच्या अंतकरणाला कसा पीळ पडतो हे त्यांनी आवर्जून नमूद केले आहे. अशा शिक्षण विचाराच्या तात्त्विक विवेचनात स्वामी विवेकानंदांनी संदेशाच्या स्वरुपात म्हटले आहे. 'आपले चारित्र्य बनवा, आपले ज्योतिर्मय, स्वयंप्रकाश, नित्य शुद्ध, वास्तविक स्वरुप प्रकट होऊ द्या.'
स्वामी विवेकानंदांचे शिक्षण विचार
|