बातम्या

कोल्हापूरात पक्षासाठी एकनिष्ठ असलेली मंडळी

loyal leaders in party


By Administrator - 2/20/2024 5:32:25 PM
Share This News:



 

 कोल्हापूर राजकारण

प्रतिनिधी :पांडुरंग फिरींगे

कोल्हापूर: कोल्हापूर जिल्हा हा पुरोगामी विचारांचा असून येथील अनेकांनी "प्राण जाए लेकीन वचन ना जाए" अशी भूमिका घेतली, तर अनेकांनी स्वार्थासाठी, आपल्या भल्यासाठी पक्ष बदलली, फोडाफोडीचे राजकारण केले आहे.
एक पक्ष..एक विचार, एकच झेंडा खांद्यावर घेऊन हयातभर राजकारण करणारे नेते म्हणून जिल्ह्याच्या राजकारणातील अनेकांची ओळख जनमाणसांत घट्ट झाली आहे. सत्तेसाठी वैचारिक भूमिका नदीला सोडून कोणत्याही पक्षात उड्या मारणाऱ्यांची सध्या चलती आजही कायम आहे.तर काहींनी पक्षासाठी हाय खाल्ली तरीही पक्ष सोडला नाही.

त्या पार्श्वभूमीवर पक्षाशी एकनिष्ठ राहणाऱ्यांचे वेगळेपण उठून दिसते.

राजकारण हे समाजसेवेचे साधन होते तेव्हा लोक अनेक वर्षे एकाच पक्षाशी बांधील राहून काम करत होते. अनेकवेळा पराभव होऊनही दुसऱ्या पक्षात जाऊन पद, सत्ता मिळवावी असे त्यांना वाटले नाही. परंतु हल्ली सत्ता नसेल तर आपल्या जगण्याला काही अर्थ राहिला नाही असे राजकीय पुढाऱ्यांना वाटत आहे. त्यामुळे पक्षीय निष्ठा, आजपर्यंतची वैचारिक जडणघडण, कार्यकर्त्यांचा विचार यापैकी कशाचीही फिकीर न बाळगता राजकीय नेते या पक्षातून त्या पक्षात घाऊक उड्या मारत आहेत. त्यांना बळ देणारेच सरकार राज्यात आणि देशात सत्तेवर असल्याने या राजकारणाला ऊत आला आहे. कार्यकर्तेही आम्ही साहेबांसोबतच असे जाहीर करून या पक्षांतराला पाठबळ देत आहेत.तर निष्ठावंत कार्यकर्त्यांची गोची होताना पहावयास मिळत आहे.

जिल्ह्याच्या राजकारणाचा विचार करता ज्येष्ठ नेते कैलासवासी रत्नाप्पाण्णा कुंभार, शेकापचे त्र्यंबक सीताराम कारखानीस, शाहूवाडीचे राऊ धोंडी पाटील, गोविंदराव कलिकते, राधानगरीचे जनता दलाचे नेते शंकर धोंडी पाटील, ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे, श्रीपतराव शिंदे, प्रा. एन. डी. पाटील यांच्या बरोबरच संपतराव पवार, आमदार पी. एन. पाटील,आम.सतेज पाटील यांची जिल्ह्याच्या इतिहासात वेगळी ओळख निर्माण झाली आहे. साधारणत: १९९० च्या दशकांपर्यंत लोक विचारधारा, राजकीय पक्षाशी निष्ठा याला महत्त्व द्यायचे. सत्तेसाठी राजकारण असे त्याचे स्वरूप झाल्यावर दलबदलूपणा वाढला.

संपतराव पवार व आमदार पी. एन. पाटील हे एकाच मतदार संघातील परस्परांचे राजकीय विरोधक परंतु त्यांच्यातील पक्षाशी बांधीलकी हा समान गुण महत्त्वाचा ठरला. पक्ष अडचणीत असताना पी. एन. यांनी जिल्ह्यात पक्षाची धुरा सांभाळली. संधी असतानाही ती ठोकरून ते झेंड्याशी प्रामाणिक राहिले.  तर विधानसभेची २००४ ची निवडणूक अपक्ष  जिंकल्यानंतरही सतेज पाटील काँग्रेसशी एकनिष्ठ राहून जिल्ह्यात तसेच राज्यातही पक्षाला बळ देत आहेत.ते एकनिष्ठ राहिल्याने त्यांना जिल्ह्यात मानणारा मोठा जनसमुदाय आहे. तसेच जिल्ह्याच्या बाहेरील दांडगा संपर्क असल्यानेच, त्यांना  पक्षातही आगामी काळात चांगली संधी  देण्यात आलीयापुढे ही निश्चित मिळेल. माजी मंत्री जयवंतराव आवळे यांचे घराणेही पक्षाशी बांधील राहिले आहे. पन्हाळ्याचे माजी आमदार कै.यशवंत एकनाथ पाटील हे देखील काँग्रेसच्या विचारधारेशी प्रामाणिक राहिले होते.

कार्यकर्तेही निष्ठावंतच..

  नेतेमंडळी  बरोबरच जिल्ह्यातील अनेक कार्यकर्ते ही एकनिष्ठ राहिले असल्याने पक्षाला बळ आले.या कार्यकर्त्यांकडे पक्षाने दुर्लक्ष केले असल्याचे काहीनी सांगितले.
  गेल्या दिड वर्षात महाराष्ट्रातील घडामोडींचा गावपातळीवर मोठा फटका अनेक पक्षाला बसला आहे. याचा काहींना न कळत फायदा तर काही जाणीवपूर्वक अडचणीत सापडले आहेत. याचा येणाऱ्या निवडणुकीत परिणाम झालेला निश्चितच दिसेल. असे अनेकांनी बोलून दाखवला आहे.


कोल्हापूरात पक्षासाठी एकनिष्ठ असलेली मंडळी