बातम्या
कोल्हापूर परिमंडलात ‘दिपोत्सव 2024’ कार्यक्रम उत्साहात संपन्न
By nisha patil - 10/29/2024 9:41:54 PM
Share This News:
कोल्हापूर परिमंडलात ‘दिपोत्सव 2024’ कार्यक्रम उत्साहात संपन्न
महावितरण कर्मचाऱ्यांना मनोरंजनातून मिळाली ऊर्जा !
कोल्हापूर/सांगली दि. २९ ऑक्टोबर २०२४ : दररोजच्या कामातून येणारे ताण-तणाव कमी करण्यासाठी महावितरणच्या कोल्हापूर परिमंडलाअंतर्गत येणाऱ्या कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील कर्मचारी यांच्या करिता ‘दिपोत्सव 2024’ या मनोरंजनात्मक कार्यक्रमाचे आयोजित करण्यात आले. त्यास वीज कर्मचारी, अधिकारी व त्यांच्या कुटुंबियांनी भरभरुन प्रतिसाद दिला. या कार्यक्रमाने वीज कर्मचाऱ्यांचा फक्त ताण-तणावच दूर केला नाही तर त्यांना नवी ऊर्जा सुद्धा दिली. हा कार्यक्रम सुर्या सांस्कृतीक हॉल, गडहिंग्लज येथे मोठ्या उत्साहात साजरा केला.
कार्यक्रमाचे उद्घाटन मुख्य अभियंता स्वप्निल काटकर यांनी केले. यावेळी बोलताना स्वप्नील काटकर म्हणाले, ‘या सांस्कृतिक कार्यक्रमाचा सर्वांनी मनमुराद आनंद घ्यावा. यातून प्राप्त होणारी ऊर्जा आपणास नियमित कामात वापरून कोल्हापूर परिमंडलास कायम प्रथम क्रमांकावर ठेवायचे आहे.’ यावेळी काटकर यांनी सर्वाना दिवाळी निमित्त शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी मंचावर अधीक्षक अभियंते गणपत लटपटे (कोल्हापूर मंडल), धर्मराज पेठकर (सांगली मंडल), श्रीमती पुनम रोकडे (पायाभूत आराखडा कोल्हापूर परिमंडल) यांच्यासह सहा. महाव्यवस्थापक शशिकांत पाटील (मासं), सहा. महाव्यवस्थापक श्री.विजय गुळदगड (विवले), कार्यकारी अभियंते सर्वश्री सुनीलकुमार माने, दत्तात्रय भणगे, विजयकुमार आडके, प्रशांत राठी, दिपकराव पाटील, प्रविण पंचमुख, देवदास कोरडे व कार्याक्रमाचे समन्वयक तथा उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी .शिरीष काटकर यांची उपस्थिती होती.
उद्घाटनानंतर सारेगामापा फेम व कलर्स मराठी वरील ‘सुर नवा ध्यास नवा’ उपविजेता श्री. राजू नदाफ यांच्या ऑर्केस्ट्राचे आयोजन करण्यात आले होते. कलाकारांनी एकाहून एक सरस गाणी सादर करुन प्रेक्षकांची मने जिंकली. तसेच महिलांसाठी होम मिनीस्टर व संगीत खुर्ची हे कार्यक्रम घेण्यात आले. महिलांमध्ये श्रीमती वेदिका प्रदीप वंजारे या पैठणीच्या मानकारी ठरल्या. यावेळी महावितरणचे शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त कर्मचारी नरेश सावंत यांची क्रीडा अधिकारी, महाराष्ट्र शासन पदी निवड झाल्याने मुख्य अभियंता स्वप्नील काटकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाला कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील सुमारे दीड हजारांहून अधिक वीज कर्मचारी, अभियंते व अधिकारी त्यांच्या कुटुंबासह सहभागी झाले होते. यावेळी बालगोपालांसाठी खेळण्याची व्यवस्था सुध्दा करण्यात आली होती. सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन उपकार्यकारी अभियंता . नागेश बसरीकट्टी यांनी केले.
कोल्हापूर परिमंडलात ‘दिपोत्सव 2024’ कार्यक्रम उत्साहात संपन्न
|