बातम्या
तोंडाला पाणी आणणारी औषधी चिंच
By nisha patil - 12/9/2023 7:27:05 AM
Share This News:
चिंच असे नुसते नाव घेतले तरी तिच्या आंबट गोड चवीच्या आठवणीने तोंडाला पाणी सुटते. त्यातल्या त्यात गाभुळलेल्या चिंचेची गोडीच और..! चिंच ही मूळची मध्य आफ्रिकेतील एबिसिनिया देशातले असले, तरी ते हजारो वर्षांपूर्वीच संपूर्ण जगभर पसरले.
आपल्या भारतातही चिंचेचे झाड घराजवळ, गावांत आणि रस्त्यांच्या बाजूने लावलेले दिसते. क्वचित हे झाड जंगलातदेखील आढळते. मध्ययुगीन काळात इराकमधील बसरा बंदर हे चिंचेचे प्रमुख आयात केंद्र होते.
“भारतीय तमर’ अथवा “तमर-ए-हिंद’ या नावाने चिंचेची आयात व्हायची. या नावामुळेच चिंचेचे लॅटिन नाव देखील ढरारीळपर्वीी खपवळलर असे ठेवण्यात आले आहे. भारतीय ग्रंथांपैकी मत्स्यपुराण, अमरकोश, चरक-संहिता, सुश्रुत-संहिता यांत चिंचेचा उल्लेख तीतिंडी म्हणून केलेला आढळतो. मध्य आफ्रिकेत मूळ असलेल्या या झाडांचा प्रसार उष्ण कटिबंधातील बहुतांश देशात कमीजास्त प्रमाणात झालेला आहे. ही चिंच सध्या नाईल नदीच्या उत्तरेकडील भागात, जावा, जमाईका, वेस्ट इंडिज, ब्राझील, मध्य अमेरिका, ऑस्ट्रेलियाचा उष्ण कटिबंधाचा भाग, दक्षिण व मध्य भारत इत्यादी भागात मुबलक प्रमाणात आढळते. हे झाड कधीही पर्णरहित असत नाही.
चिंच कडक थंडीला संवेदनशील असून थंड प्रदेशात लागवड केली तर फलधारणा होत नाही, पण अत्यंत कडक उन्हाळा व पाण्याचे दुर्भिक्ष्य असले तरीही तग धरून राहते. मार्च एप्रिल महिना आला की झाडाला नवी कोवळी पोपटी रंगाची पालवी फुटते. आणि लगेचच एप्रिल-मे मध्ये पिवळी, गुलाबी, लाल पट्टे असलेली नाजूकशी फुले भरपूर प्रमाणात येतेत आणि झाडाखाली पाकळ्यांचा छान सडा पडलेला दिसतो. हिरव्या बिया झाडावरच सुमारे सात आठ महिने परिपक्व झाल्यावर फांद्या हलवून किंवा काठीने हलकासा प्रहर करून खाली पडल्या जातात. टरफल टणक पण ठिसूळ असते. आतील तंतुमय गर तांबूस तपकिरी रंगांचा असतो.
आयुर्वेद शास्त्रात व पारंपारिक औषध शास्त्रात चिंचेचे बरेच उपयोग दिलेले आहेत. झाडाची साल हि लकवा किंवा शरीराच्या अवयवाची संवेदना शिथिल झाल्यास लेप करण्यासाठी वापरतात. तसेच सालीच्या राखेचा उपयोग अल्सर, स्त्रीरोग, लघवी होण्यास त्रास होणे इत्यादी वरील औषधांमध्ये होतो. चिंचेच्या पानांचा उपयोग सूज कमी होण्यास, गजकर्ण, रक्ताचे विकार, दंतशूल, कर्णशुल, डोळ्याचे विकार, ट्युमर इत्यादी रोगांवर इलाज करण्यासाठी होतो.
तोंडाला चव आणणारी-स्वयंपाकघरात हमखास लागणारी स्वयंपाकघरात नित्य वापरण्यासाठी चिंच आवश्यक असते. चिंच आमटी आणि भाजीत वापरतात. पिकलेली चिंच भूक वाढवते. आंबटगोड अशी चव असणारी चिंच आणि चिंचेचं बी, टरफल यांचे औषधी गुणधर्म आहेत.
पिकलेल्या चिंचेचा स्वाद आंबट, गोड आणि तुरट असल्यानं भाजीत किंवा आमटीत वापरल्यानं तोंड स्वच्छ होतं.
चांगली पिकलेली चिंच एक किलो घेऊन ती दोन लीटर पाण्यात चार ते पाच तास भिजत ठेवावी. नंतर कुसकरून ते पाणी गाळून घ्यावं. पाणी अर्ध आटवावं. त्यात दोन किलो साखर मिसळून पाक करून घ्यावा. हे सरबत रात्री प्याल्यानं सकाळी शौचाला साफ होते आणि मलावरोधाची तक्रार/सवय दूर होते.
चिंचेचा कोळ, कांदा रस आणि आल्याचा रस एकत्रित दिल्यास ओकारी, जुलाब, पोटदुखी थांबते.
रक्ती आव, जुलाब विकारात चिंचोके (चिंचेचे बी) पाण्यात वाटून देतात. चिंचोक्यांपासून चिकटवण्यासाठी खळही बनवतात.
चिंचेच्या टरफलापासून चिंचाक्षार बनवतात वेगवेगळ्या वनौषधी आणि या चिंचेच्या क्षारापासून बनवलेल्या शंखवटी नावाच्या गोळ्या पोटदुखीवरचे उत्तम औषध आहे. लिंबू रसाबरोबर या गोळ्या सकाळ, संध्याकाळ विशिष्ट प्रमाणात घ्याव्यात.
अशी ही चिंच स्वयंपाकघरातील एक अविभाज्य घटक तर आहेच, त्याचप्रमाणे तोंडाची चव भागवणारी, आंबटगोड अशी चिंच वेगवेगळ्या गुणधर्मामुळे एक औषध म्हणूनही उपयुक्त आहे.
तोंडाला पाणी आणणारी औषधी चिंच
|