चंद्राच्या तिसऱ्या कक्षेत पोहोचलं चांद्रयान-3
By surekha - 9/8/2023 5:05:22 PM
Share This News:
चंद्राच्या तिसऱ्या कक्षेत पोहोचलं चांद्रयान-3
भारताची महत्त्वाकांक्षी अंतराळ मोहीम असलेले चांद्रयान-3 चंद्रावर कधी पोहोचणार याची प्रतीक्षा सर्व भारतीयांना आहे . येत्या काही दिवसातच चांद्रयान चंद्रावर उतरणार आहे. आज चांद्रयान-३ ने एक महत्त्वाचा टप्पा पार पाडला आहे. इस्त्रोने चांद्रयान-३ ला चंद्राच्या तीसऱ्या कक्षेमध्ये पोहचवले आहे. आता चांद्रयान १७४ किमी x १४३७ किलोमीटर अंतराच्या लहानशा लंबवर्तुळाकार कक्षेत फिरत आहे. चांद्रयान-२ निर्धारित टार्गेटच्या पुढे पोहचल्याची देखील शक्यता आहे.
याबाबत अधिक माहिती अशी कि , इस्त्रोने ९ ऑगस्ट दुपारी १ वाजून ४० मिनिटांनी चांद्रयान-३ च्या कक्षेमध्ये बदल केला. म्हणजेच चांद्रयान-३ च्या थ्रस्टर्सना ऑन करण्यात आले. ५ ऑगस्ट २०२३ रोजी चांद्रयान-३ चंद्राच्या पहिल्या कक्षेत पोहचले होते. तेव्हा चांद्रयानाने चंद्राचा पहिला फोटो देखील प्रसिद्ध केला होता. तेव्हा चांद्रयान-३ चंद्रा भोवती १९०० किलोमीटर प्रति सेकंद इतक्या वेगाने १६४ X १८०७४ किमी लंबवर्तुळाकार कक्षेत फिरत होते. ज्याला ६ ऑगस्ट २०२३ रोजी कमी करून १७० x ४३१३ किमी कक्षेत पोहचले होते. म्हणजेच चांद्रयान-३ ला दुसऱ्या कक्षेत पोहचवण्यात आलं होतं.त्यानंतर आज चंद्रयान -३ आता तिसऱ्या कक्षात पोहचले आहे .
दरम्यान चंद्रयान -३ आता 14 ऑगस्ट रोजी चंद्रयान चौथ्या कक्षेत प्रवेश करणार आहे. 16 ऑगस्टला सकाळी 8.38 ते 8.39 दरम्यान पाचव्या कक्षेत प्रवेश करेल. 17 ऑगस्टला चांद्रयान-3 चे प्रोपल्शन आणि लँडर मॉड्यूल वेगळे होतील. त्याच दिवशी, दोन्ही मॉड्यूल चंद्राभोवती 100 किमी x 100 किमीच्या वर्तुळाकार कक्षेत असतील.18 ऑगस्ट रोजी लँडर मॉड्यूलचे डीऑर्बिटिंग दुपारी 4.45 ते 4 दरम्यान होईल. म्हणजेच त्याच्या कक्षेची उंची कमी होईल. 20 ऑगस्ट रोजी चांद्रयान-3 चे लँडर मॉड्यूल रात्री 1.45 वाजता डि-ऑर्बिटिंग करेल. 23 ऑगस्ट रोजी लँडर चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ उतरेल. जर सर्व काही ठीक झाले तर लँडर 6.30 वाजता चंद्राच्या पृष्ठभागावर उतरेल.
|