मराठा आंदोलनांमुळे परीक्षार्थींच्या वाटेत अडचणींचा डोंगर

Due to the Maratha agitations there is a mountain of difficulties in the way of the examinees
By Administrator - 7/20/2024 2:15:19 PM
Share This News:

 

....  मराठा आंदोलनांमुळे परीक्षार्थींच्या वाटेत अडचणींचा डोंगर... 

 गेल्या अनेक दिवसांपासून तलाठी परीक्षा चर्चेत आहे. परीक्षेची तारीख जाहीर झाल्यापासूनच, या संपूर्ण प्रक्रियेत येणाऱ्या अडचणींची चर्चा जास्त झाली आहे. कधी कॉपीची कीड, तर कधी सर्व्हर डाऊनमुळे अडचणी यामुळे तलाठी परीक्षा चर्चेचा विषय ठरली आहे. इतकं सगळं होत होत, आता सोमवारी या परीक्षेचा तिसरा टप्पा पार पडणार आहे. मात्र यावेळीही मराठा आंदोलनामुळे परीक्षार्थींच्या वाटेत अडचणींचा डोंगर उभा राहू शकतो. काही जिल्ह्यांत बंदची हाक, तर अनेक ठिकाणी एसटी बंद... त्यामुळे, तलाठी परीक्षेचं हे दिव्य कसं पार पडणार? याची परीक्षार्थींना डोकेदुखी निर्माण झाली आहे. 

राज्याचे विरोधीपक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी काल (रविवारी) एक ट्वीट केलं होतं. या ट्वीटमध्ये त्यांनी तलाठी परीक्षा पुढे ढकलण्याबाबत राज्याच्या मुख्य सचिवांशी चर्चा करून मागणी केल्याचं म्हटलं होतं. परंतु, अद्याप परीक्षा पुढे ढकलण्याबाबत प्रशासनाकडून कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. ट्वीटमध्ये वडेट्टीवार म्हणाले की, "राज्यात उद्या तलाठी परीक्षा आहे, ही परीक्षा पुढे ढकलण्यात यावी यासाठी राज्याच्या मुख्य सचिवांशी चर्चा करून मागणी केली आहे. मराठा आरक्षणाची मागणी करणार्‍या आंदोलकांवर झालेल्या अमानुष लाठीचार्ज निषेधार्थ उद्या बंद पुकारण्यात आला आहे. उमेदवारांना परीक्षेसाठी दुसऱ्या जिल्ह्यात जावे लागणार आहे. मराठवाड्याकडे जाणाऱ्या एसटी बसेस सरकारने बंद केल्या आहे त्यामुळे सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवर भार वाढून वाहतूक व्यवस्थेवर परिणाम होण्याची शक्यता आहे.  त्यामुळे तलाठी भरती परीक्षेच्या परीक्षार्थींना फटका बसू नये ,म्हणून ही परीक्षा तातडीने पुढे ढकलण्याची घोषणा सरकारने करावी."