ड्रग्जच्या विळख्यात शिक्षणाचं माहेरघर
By surekha - 8/22/2023 5:37:21 PM
Share This News:
ड्रग्जच्या विळख्यात शिक्षणाचं माहेरघर
मागील काही दिवसांपासून पुणे शहर ड्रग्जच्या विळख्यात असल्याचं समोर आलं आहे. त्यातच आता शिक्षणाच्या माहेर घरात 1 कोटी रुपयाचे अफीम जप्त करण्यात आलं आहे. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथक एकने 3 जणांना अटक केली आहे. राजस्थानची टोळी अफीमचा साठा गोळा करत होती, असं तपासात समोर आलं आहे.
सुमेर जयरामजी बिष्णोई, चावंडसिंग मानसिंग राजपूत, लोकेंद्रसिंह महेंद्रसिंग राजपूत असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. पुण्यातील गोकुळनगर भागात पोलिसांनी कारवाई केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुन्हे शाखेचे पोलीस कर्मचारी कात्रज भागात पेट्रोलींग करत असताना माहिती मिळाली की, कात्रज-कोंढवा रोडवर एक व्यक्ती अफिम या अंमली पदार्थाची विक्री करत आहेत. पोलिसांनी छापा टाकून सुमेर बिष्णोई याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून 64 लाख 28 हजार रुपये किमतीचे 3 किलो 214 ग्रॅम अफीम जप्त केले. अधिक चौकशी केली असता त्याने अफिम हे त्याच्या दोन साथीदार चावंडसिंग राजपूत आणि लोकेंद्रसिंह राजपूत यांच्याकडून आणल्याचे सांगितले. तसेच त्यांनी अंमली पदार्थाचा साठा करुन ठेवल्याचे सांगितले. त्यानुसार आरोपींकडून 1 कोटी रुपयाचे अमली पदार्थ जप्त केले आहे. नेमके हे अमली पदार्थ कुठे विकले जाणार होते याचा तपास पोलीस करत आहेत.अफिमची शेती करणं महाराष्ट्रात बेकायदेशीर आहे. तरीही अनेक शेतकरी अमली पदार्थांची शेती करताना दिसता. पैशासाठी हा शेतकऱ्याचा खेळ सुरु असतो. मात्र याचा पोलिसांना सुगावा लागला की शेतकऱ्यांवर कारवाई होते. अफिमच नाही तर गांजाची लागवड केल्याचेदेखील प्रकार अनेकदा समोर आले आहे. आतापर्यंत महाराष्ट्रातील विविध परिसरातील शेतकऱ्यांवर अफिमची किंवा इतर अमली पदार्थाची लागवड केल्याने कारवाई करण्यात आली आहे. पोलिसांच्या विशेष पथकाकडून अशा शेतकऱ्यांवर नजर देखील ठेवण्यात येते.
|