बातम्या

जयसिंगपूरमध्ये दुसरे नांगरट साहित्य संमेलन

2nd Nangarat Sahitya Samela in Jaisingpur


By Administrator - 2/17/2025 4:29:35 PM
Share This News:



जयसिंगपूरमध्ये दुसरे नांगरट साहित्य संमेलन

शेतीच्या किड्या-मुंग्यांचे वर्णन ज्या साहित्यांमध्ये येते, त्या साहित्यांद्वारे शेतकऱ्यांच्या वेदना समोर येतात, अशी भावना नांगरट साहित्य संमेलनाचे संमेलनाध्यक्ष इंद्रजित भालेराव यांनी व्यक्त केली. जयसिंगपूरमध्ये आयोजित दुसऱ्या नांगरट साहित्य संमेलनात ते बोलत होते. शेतीच्या संस्कृतीचा इतिहास सांगताना भालेराव यांनी चळवळीच्या व्यथा मांडल्यामुळे कवि निर्माण झाल्याचे सांगितले. शेतकऱ्यांच्या संघर्षाची शोकांतिका देखील उपस्थित केली, ज्या शेतकऱ्यांनी राज्यकर्त्यांच्या बुरुजावर हल्ले केले, त्याच बुरूजावर त्यांचे पोरे चौकीदार म्हणून काम करत आहेत.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने जयसिंगपूरमध्ये हा साहित्य संमेलन मोठ्या उत्साहात पार पडला. सकाळी ग्रंथदिंडी व शेतीऔजार दिंडीने संमेलनाची सुरुवात झाली. यावेळी साहित्यिक शरद जोशी यांनी साहित्यनगरीत शेती औजारांचे पूजन करून संमेलनाचे उद्घाटन केले. उद्घाटनानंतर, ज्येष्ठ साहित्यिक लक्ष्मीकांत देशमुख यांनी चंगळवादामुळे शेतकऱ्यांचे जीवन मोडीत काढले असल्याचे सांगितले. शेतकऱ्यांना अर्थकारणाचा केंद्रबिंदू बनवण्यासाठी संघर्षाची आवश्यकता आहे, असे त्यांनी सांगितले.

संमेलनाचे स्वागताध्यक्ष राजू शेट्टी यांनी शेती, शेतकरी व शेतमजूर यांच्या वेदना मांडल्या. शेतकऱ्यांचे शोषण थांबवण्याचा त्यांचा संदेश होता. यावेळी शेतकरी चळवळीतील जीवनगौरव पुरस्कार शंकर धोंडगे आणि पत्रकारीतेतील जीवनगौरव पुरस्कार वसंत भोसले यांना देण्यात आले.

वसंत भोसले यांनी शेतकऱ्यांच्या योगदानावर प्रकाश टाकला आणि शेतकरी क्षेत्रातील सुसंस्कृततेचे महत्त्व सांगितले. शंकर धोंडगे यांनी शेतकरी चळवळीच्या इतिहासातील महत्त्वाचे कार्य सांगितले.

दुपारच्या सत्रात "चंगळवादी व्यवस्थेतील बेदखल शेतकरी" या विषयावर ज्येष्ठ साहित्यिक शेषराव मोहिते, पत्रकार श्रीराम पवार आणि राधेशाम जाधव यांनी आपल्या विचारांची मांडणी केली. त्यांनी चंगळवादी व्यवस्थेच्या परिणामांचा विश्लेषण केला आणि शेतकऱ्यांना न्याय मिळवण्यासाठी लागणाऱ्या चळवळीचे महत्त्व सांगितले.

सायंकाळच्या सत्रात ज्येष्ठ कवी प्रकाश होळकर, विजय चोरमारे, निलम माणगांवे, संजीवनी तडेगांवकर, लता ऐवळे, आबासाहेब पाटील, वसंत पाटील यांच्या उपस्थितीत कवी संमेलन पार पडले.


जयसिंगपूरमध्ये दुसरे नांगरट साहित्य संमेलन
Total Views: 31