बातम्या
फुटबॉल स्पर्धेच्या गोंधळावर चौकशी समिती नेमा - आप युवा आघाडीची कुलगुरूंकडे मागणी
By nisha patil - 2/14/2025 10:57:57 PM
Share This News:
कोल्हापूर – शिवाजी विद्यापीठाच्या फुटबॉल संघाच्या व्यवस्थापनातील त्रुटींमुळे खेळाडूंना अडचणींचा सामना करावा लागल्याने, या संपूर्ण प्रकाराची चौकशी करून जबाबदारांवर कारवाई करावी, अशी मागणी आप युवा आघाडीने कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांच्याकडे केली.
छत्रपती शाहूजी महाराज विद्यापीठ, कानपूर येथे झालेल्या अखिल भारतीय अंतर विद्यापीठ फुटबॉल स्पर्धेसाठी शिवाजी विद्यापीठाचा संघ गेला होता. मात्र, काही खेळाडू आणि संघ व्यवस्थापक मुंबईपर्यंत पोहोचल्यावर अर्ध्या वाटेतून परत आले. प्रवास व निवास व्यवस्थेतील त्रुटींमुळे संघाचे मनोधैर्य खचले, परिणामी संघाला 8-0 अशा मोठ्या गोलफरकाने पराभव पत्करावा लागला.
यासंदर्भात चौकशी समिती स्थापन करून दोषींवर कठोर कारवाई करावी, तसेच भविष्यात अशा त्रुटी टाळण्यासाठी खेळाडूंच्या प्रवास व निवास व्यवस्थेची जबाबदारी विद्यापीठाने घ्यावी, अशी मागणी करण्यात आली. जर रेल्वे तिकिटे उपलब्ध नसतील, तर खेळाडूंसाठी विमान प्रवासाची सोय करावी, असेही सुचवण्यात आले.
फुटबॉल संघाच्या निवड प्रक्रियेत पारदर्शकता यावी म्हणून निवड समितीमध्ये बदल करून दरवेळी नवीन तीन सदस्यांची निवड करावी, अशी सूचनाही करण्यात आली. तसेच, स्पर्धेत अनुपस्थित राहिल्यास कोणती कारवाई होईल, याबाबत आधीच स्पष्टता द्यावी, अशी मागणी युवा आघाडीने केली.
कुलगुरूंनी या मागण्यांची दखल घेत पुढील बोर्ड ऑफ स्पोर्ट्सच्या बैठकीत या मुद्द्यांवर चर्चा करण्याचे आणि आवश्यक सुधारणा करण्याचे आश्वासन दिले.
यावेळी युवा आघाडीचे शहराध्यक्ष मोईन मोकाशी, महासचिव दिग्विजय चिले, प्रथमेश सूर्यवंशी, उत्तम पाटील, अभिजित कांबळे, सूरज सुर्वे, आदित्य पवार आदी उपस्थित होते.
फुटबॉल स्पर्धेच्या गोंधळावर चौकशी समिती नेमा - आप युवा आघाडीची कुलगुरूंकडे मागणी
|