बातम्या

लोकसभा निवडणुकीनंतर जुन्या मित्रांमधील संवादाचे दरवाजे उघडे?

After the Lok Sabha elections the doors of communication between old friends open


By nisha patil - 6/27/2024 8:01:10 PM
Share This News:



राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला गुरुवारपासून मुंबईत सुरुवात झाली. अधिवेशनात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये कटूता पाहायला मिळेल, असा अंदाज होता. मात्र, आज सकाळी अधिवेशनाला सुरुवात होण्यापूर्वी एक वेगळेच पण सुखद  चित्र पाहायला मिळाले.  संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील  यांनी आज अधिवेशनाचा पहिला दिवस असल्याने विरोधी पक्षनेत्यांची भेट घेतली. ते विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या कार्यालयात आले होते.यावेळी चंद्रकांत पाटील यांनी विरोधी पक्षनेत्यांना एक भलेमोठे चॉकलेट दिले. यावेळी अंबादास दानवे यांच्या कार्यालयात उद्धव ठाकरे आणि अनिल परब  हेदेखील उपस्थित होते.

चंद्रकांत पाटील दालनात येताच या सर्व नेत्यांमध्ये हसतखेळत संवाद सुरु झाला. चंद्रकांत पाटील दालनात आल्यावर अंबादास दानवे यांनी त्यांच्यासमोर पेढ्याचा बॉक्स धरला. दादा लोकसभा निवडणुकीत आमचे 31 खासदार निवडून आले म्हणून आम्ही पेढे वाटत आहोत, असे अंबादास दानवे यांनी म्हटले. यानंतर चंद्रकांत पाटील यांनी त्यांच्या हातातील पेढ्याचा एक तुकडा शेजारी उभे असलेल्या अनिल परब यांना देत म्हटले की, मी यांचा पेढा अॅडव्हान्समध्ये वाटतो. ठाकरे गटाचे अनिल परब हे नुकतेच मतदान पार पडलेल्या मुंबई पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीला उभे आहेत. त्यांच्याविरोधात भाजपचे किरण शेलार रिंगणात आहेत. या निवडणुकीचा निकाल 1 जुलैला जाहीर होईल. मात्र, चंद्रकांत पाटील यांनी ठाकरे गटाचे उमेदवार अनिल परब यांचे अगोदरच अभिनंदन केल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.


लोकसभा निवडणुकीनंतर जुन्या मित्रांमधील संवादाचे दरवाजे उघडे?