बातम्या
दिलेले शब्द पूर्ण करणे ही आमची जबाबदारी : आमदार राजेश क्षीरसागर
By nisha patil - 12/15/2024 11:54:00 PM
Share This News:
*दिलेले शब्द पूर्ण करणे ही आमची जबाबदारी : आमदार राजेश क्षीरसागर*
नागपूर दि.१५ : १९८६ पासूनचा मी शिवसैनिक आहे. शिवसेनाप्रमुखांच्या आदेशाने भारतीय विद्यार्थी सेनेचा जिल्हाप्रमुख म्हणून मी कामास सुरवात केली. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यात सद्यस्थितीत मी वरिष्ठ म्हणून काम करत आहे. गेल्या दोन - अडीच वर्षात घडलेल्या घडामोडी पाहता शिवसेनेसोबत राहिलेल्या लोकप्रतिनिधीना दिले गेलेले शब्द पूर्ण करणे ही आमची जबाबदारी मानतो. त्यामुळे मोठेपणा दाखवीत या निवडीस मान्यता दिली. २०१९ ला पराभव झाल्यानंतरही आजतागायत शिवसेना मुख्यनेते व राज्याचे उपमुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे यांनी मंत्री पदाच्या दर्जाचे पद मला कायम ठेवले आहे. यासह मित्रा संस्थेच्या उपाध्यक्ष पदाची जबाबदारी असेल अथवा पक्ष संघटनेतील महत्वाची पदे असतील यातून नेहमीच माझ्यावर विश्वास दाखविण्यात आला आहे. मंत्री दर्जा पदाच्या माध्यमातून कोट्यावधी रुपयांचा निधी देवून मुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे यांनी कोल्हापूर जिल्ह्याच्या विकास करण्याची संधी दिली आहे. मंत्री पद असल्यावरच राज्याचा व जिल्ह्याचा विकास साध्य करता येते असे नाही. मी कोल्हापूर जिल्ह्यातील वरिष्ठ लोकप्रतिनिधी व शिवसैनिक असल्याने मला योग्य ती जबाबदारी दिली जाईल. शिवसेना मुख्यनेते व राज्याचे उपमुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे यांच्या खांद्याला खांदा लावून काम करणारा मी कार्यकर्ता आहे. त्यामुळे नाराजीचे कोणतेही कारण नाही. माझे सहकारी ना.प्रकाश आबिटकर यांना जाहीर सभेत मंत्री करण्याचा शब्द शिवसेना मुख्यनेते व राज्याचे उपमुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे यांनी दिला होता आणि तो शब्द ना.एकनाथ शिंदे यांनी पाळला यावरून आम्ही कोणताही खोटा शब्द देत नाही हे सिद्ध होते. आगामी महापालिका, जिल्हा परिषद, नगरपालिका, पंचायत, निवडणुकीच्या दृष्टीने शिवसेना बळकट करण्यासाठी आम्ही सर्वजण एकजुटीने काम करू. कोल्हापूर जिल्ह्यात शिवसेनेचे एक खासदार आणि चार आमदार असल्याने "पालकमंत्री" पद शिवसेनेस द्यावे, अशी मागणी शिवसेनेचा वरिष्ठ पदाधिकारी म्हणून मी शिवसेना मुख्यनेते व राज्याचे उपमुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे यांच्याकडे केली असून, याची नक्कीच दखल ना.शिंदे साहेब घेतील. नूतन मंत्री ना.हसन मुश्रीफ, ना.प्रकाश आबिटकर यांना शुभेच्छा.. अडीच - अडीच वर्षाचे मंत्रीपद असा महायुतीचा फॉर्म्युला ठरला असल्याने पुढच्या अडीच वर्षात नक्कीच मला मंत्री बनवून चांगले खाते दिले जाईल, याची मला खात्री असल्याची प्रतिक्रिया राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांनी दिली आहे.
दिलेले शब्द पूर्ण करणे ही आमची जबाबदारी : आमदार राजेश क्षीरसागर
|