बातम्या

वृद्ध महिलेचा गळा दाबून करण्यात आला खून

An old woman was strangled to death


By nisha patil - 2/24/2025 2:53:20 PM
Share This News:



वृद्ध महिलेचा गळा दाबून करण्यात आला खून

कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज शहरामध्ये वृद्ध महिलेच्या अंगावरील सोन्यासाठी तोंडात बोळा कोंबून व गळा दाबून खून केल्याची धक्कादायक घटना घडली. शोभा सदाशिव धनवडे (वय 62,रा.कचरा डेपोजवळ, गडहिंग्लज) असे या महिलेचे नाव आहे. सोलापूरे वसाहतीजवळ विहिरीत तोंडात कापडाचा बोळा कोंबल्याच्या स्थितीत महिलेचा मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली. शनिवारी संध्याकाळी त्या घरातून निघून गेल्या होत्या. त्यांच्या अंगावरील दागिने काढून घेऊन त्यांना विहिरीत ढकलून देण्यात आले. मात्र, विहिरीच्या काठावरील झाडाला मृतदेह अडकला होता. रविवारी सकाळी ही घटना उघडकीस आली. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून तपास वेगाने सुरू केला आहे. 

पोलिसांनी अनोखळी व्यक्तीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार मयत शोभा धनवडे यांचे पती सदाशिव आणि मुलगा मारुतीसह धान्याचे दुकान चालवतात. शनिवारी रात्री सदाशिव धनवडे यांना पत्नी शोभा या दिसत नसल्याने मुलगा मारुतीला त्यांनी माहिती दिली. यानंतर शोभा यांची शोधाशोध सुरू झाली. दरम्यान मारुतीने सर्वत्र फोन करून चौकशी करण्यास सुरुवात केली. मात्र त्यांची कोणतीही माहिती मिळाली नाही. त्यानंतर त्यांचा मोबाईल बंद असल्याचे लक्षात आले. त्यामुळे मध्यरात्रीच्या सुमारास मुलगा मारुतीने पोलिसांना आई बेपत्ता झाल्याची तक्रार दिली. दरम्यान, रविवारी सकाळी सुद्धा घरी काम करणाऱ्या मावशीकडे सुद्धा चौकशी केली. मात्र तिथेही त्यांची काही माहिती मिळाली नाही. त्यामुळे आईच्या शोध घेत असतानाच एका शेतातील विहिरीच्या बाजूला एक नॅपकिन, बाजूला चप्पल आणि मोबाईलचा काळसर रंगाचा कव्हर दिसून आला. मात्र, त्यामध्ये मोबाईल नव्हता आणि विहिरीत वाकून पाहिले असता कडेला झुडपामध्ये अडकलेला मृतदेह दिसून आला. यानंतर पोलिसांना माहिती देण्यात आली. 

मृतदेह बाहेर काढल्यानंतर तो शोभा यांचा असल्याचे लक्षात आलं. त्यावेळी त्यांच्या तोंडामध्ये कापडाचा बोळा व डाव्या बाजूला गळावलेला व्रण दिसून आला. त्यांच्या अंगावरील सहा तोळ्याचे घंटण, अडीच तोळ्यांचे मंगळसूत्र, सात ग्रॅम आणि आठ ग्रँमची प्रत्येकी एक अंगठी, कानातील एक तोळ्याची कर्णफुली दिसून आली नाहीत. त्यामुळे या दागिन्यांसाठी गळा आवळून खून केल्याचे स्पष्ट झाले.


वृद्ध महिलेचा गळा दाबून करण्यात आला खून
Total Views: 33