बातम्या
ज्योतिबाच्या चरणी माथा टेकून, राजू बाबा आवळे यांनी फुंकले विजयी लढाईचे रणशिंग
By nisha patil - 9/10/2024 11:36:11 AM
Share This News:
कुंभोज प्रतिनिधी (विनोद शिंगे) हातकणंगले विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजू बाबा आवळे यांनी ज्योतिबाच्या चरणी माथा टेकत हजारो सहकाऱ्यांसह गडावर गुलाल उधळून विधानसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले. दख्खनचा राजा ज्योतिबाचे दर्शन घेत, भक्तिभावाने समर्पित होत, त्यांनी आगामी निवडणुकीत विजयाचा संकल्प व्यक्त केला.
राजू बाबा आवळे यांनी मागील निवडणुकीत देखील ज्योतिबाच्या आशिर्वादाने विजयी यश संपादन केले होते. यावेळीही नवरात्रीच्या पवित्र पर्वावर त्यांनी ज्योतिबाच्या आशिर्वादासह आपल्या विजयाच्या यशाची सुरूवात केली. सोबत आलेल्या सहकाऱ्यांच्या "चांगभलं" च्या जयघोषाने परिसर दणाणून गेला. गुलालाची उधळण, भक्तीभाव, आणि निवडणूक रणधुमाळीची साक्ष यामुळे मंदिर परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.
यावेळी राजू बाबा आवळे यांनी ज्योतिबाच्या चरणी साकडे घालत म्हटले की, "राज्यात जनतेच्या हक्काचं, शेतकऱ्यांच्या सन्मानाचं, महिलांच्या सुरक्षेचं आणि तरूणांच्या भविष्याचं महाविकास आघाडीचं सरकार पुन्हा स्थापन होवो." त्यांचा हा निर्धार आणि भक्तिभावाने केलेली प्रार्थना कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण करणारी ठरली.
आगामी निवडणुकीत मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी आणि जनतेच्या विश्वासास पात्र ठरून पुन्हा विजय मिळविण्याचा संकल्प आवळे यांनी केला. उपस्थित सहकाऱ्यांनी देखील जोतिबाच्या आशिर्वादाने विजयाचा एल्गार करण्याची तयारी दाखवत, "आपण सर्वांनी एकत्रित येऊन पुन्हा एकदा विजयश्री खेचून आणू" असा विश्वास व्यक्त केला.
या भक्तिमय आणि जोशपूर्ण वातावरणात, हातकणंगले मतदारसंघात निवडणुकीची धुमश्चक्री सुरू झाल्याचे संकेत मिळाले आहेत.
ज्योतिबाच्या चरणी माथा टेकून, राजू बाबा आवळे यांनी फुंकले विजयी लढाईचे रणशिंग
|