बातम्या
शेतीक्षेत्रासाठी अर्थसंकल्प निराशाजनक - राजू शेट्टी
By nisha patil - 1/2/2025 6:52:07 PM
Share This News:
शेतीक्षेत्रासाठी अर्थसंकल्प निराशाजनक - राजू शेट्टी
जयसिंगपूर (प्रतिनिधी) – अर्थमंत्री निर्मला सितारामण यांनी आज सादर केलेला केंद्रीय अर्थसंकल्प शेतीक्षेत्रासाठी निराशाजनक असल्याची प्रतिक्रिया स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांनी दिली. त्यांच्या मते, या अर्थसंकल्पात अनेक मोठ्या घोषणांसोबतच पोकळ वल्गना केल्या गेल्या आहेत.
राजू शेट्टी म्हणाले, "भारत कृषीप्रधान देश असताना, सरकारने कृषीक्षेत्रासाठी पर्यावरणपूरक खेळण्यांचा हब बनवण्याची घोषणा केली आहे. यामुळे सरकारचा शेती क्षेत्राबाबतचा दृष्टीकोन स्पष्ट होतो." ते पुढे म्हणाले, "किसान क्रेडिट कार्डची कर्जमर्यादा वाढवली, डाळींसाठी आत्मनिर्भर होण्याची घोषणा केली, आणि धनधान्य कृषी योजना जाहीर केली. पण, या सर्व घोषणांमध्ये सिंचन आणि पायाभूत सुविधांच्या बाबतीत कोणताही निर्णय घेतला गेलेला नाही."
तसेच, शेट्टी यांनी जीएसटीवरही भाष्य करत, "खते, बियाणे, किटकनाशके आणि शेती उपकरणांवर ६ ते ३० टक्के जीएसटी लावला आहे. यामुळे शेती व्यवसायाला बुस्टर डोस मिळवून देण्यासाठी जीएसटी करामध्ये सवलत देण्याची गरज होती," असे सांगितले.
शेट्टी यांनी महागाई, नैसर्गिक आपत्ती, आयात-निर्यात धोरणाच्या अस्थिरतेमुळे शेतकऱ्यांचा आर्थिक ताण वाढला असल्याचं नमूद केलं. "डाळ व तेलबिया उद्योगपतींच्या फायद्यासाठी आयात केली जातात, आणि शेतकऱ्यांच्या उत्पादनाला चांगले भाव मिळाल्यावर निर्यातबंदी लावली जाते. या सर्व कारणांमुळे देशातील शेतकऱ्यांसाठी या अर्थसंकल्पात शाश्वत रोजगार आणि फायदे दिसत नाहीत," असे ते म्हणाले.
शेतीक्षेत्रासाठी अर्थसंकल्प निराशाजनक - राजू शेट्टी
|