बातम्या
छत्रपती शिवाजी महाराजांचे युद्ध कौशल्य, नीती, गनिमी कावा सर्वांना अभिमानास्पद - मंत्री सुधीर मुनगंटीवार
By nisha patil - 2/8/2024 11:19:22 AM
Share This News:
सांस्कृतिक कार्य मंत्री मुनगंटीवार म्हणाले की, महाराष्ट्राचा इतिहास हा छत्रपती शिवाजी महाराजांचा प्रेरणादायी इतिहास आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचे युद्ध कौशल्य, नीती, गनिमी कावा हे आजही अनेक पिढ्यांना प्रेरणादायी आहे. त्यांचा इतिहास हा केवळ महाराष्ट्रासाठी नव्हे, तर देशासाठी अभिमानास्पद आहे. गेल्या दोन वर्षात राज्य शासनाने येथील गड किल्ल्यांच्या डागडुजी आणि सुधारणासाठी प्रयत्न केले. हा वारसा जपण्यासाठी अधिक निधी राज्य शासनाने उपलब्ध करुन दिला आहे. भारतीय पुरातत्व विभागाच्या साहाय्याने या गड किल्ल्यांना अधिक चांगले रुप देऊन सर्वांना प्रेरणा देणारा इतिहास प्रत्यक्ष जाऊन पाहण्याची संधी उपलब्ध होणार आहे. सर्वांच्या सहकार्य आणि समन्वयातून निश्चितपणे जागतिक वारसा स्थळांमध्ये याचा समावेश होईल, असे त्यांनी नमूद केले.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या या गड किल्ल्यांचे पावित्र्य जपले जावे, यासाठी तेथे मद्यपान करणाऱ्यांना कडक शिक्षेची तरतूद असणारा कायदा राज्य शासन लवकरच आणणार असल्याची माहितीही मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी दिली.
गड किल्ल्यांशी भावनिक ओढ हे येथील वेगळेपण- विशाल शर्मा
जागतिक वारसा केंद्र समितीच्या 46 व्या अधिवेशनाचे अध्यक्ष श्री. शर्मा यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. जागतिक वारसा यादीत नोंद ही मोठी गोष्ट आहे. प्रत्येक देश हे जागतिक पातळीवर त्यांच्या देशातील वैशिष्ट्यपूर्ण गोष्टींची नोंद व्हावी, यासाठी प्रयत्न करत असतो. त्यामुळे अधिक सकारात्मक पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराजांचे हे किल्ले आणि तेथील इतिहास हा युनेस्कोच्या प्रतिनिधींपर्यंत पोहोचला पाहिजे. येथील गडकिल्ल्यांचे वैशिष्ट्य म्हणजे येथील नागरिकांची भावना ही त्याच्याशी जोडली गेली आहे. जगात इतरत्र कुठे असे पाहायला मिळत नाही. त्यामुळे ही बाब अतिशय सकारात्मक परिणाम करणारी ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. जागतिक वारसा केंद्र समितीचे अधिवेशन पहिल्यांदा भारतात झाल्याचे त्यांनी नमूद केले.
येथील गड किल्ले, त्यांच्या संरक्षणासाठीचे प्रयत्न, तेथे सध्या कशा प्रकारे व्यवस्थापन केले जात आहे, स्थानिक नागरिकांचा सहभाग कसा आहे याबाबीही महत्वपूर्ण असल्याचे श्री. शर्मा यांनी सांगितले. ज्यावेळी या गडकिल्ल्यांना युनेस्कोच्या जागतिक वारसा केंद्राचे प्रतिनिधी भेट देतील, त्यावेळी ही बाब प्रकर्षाने पाहिली जाईल. त्यामुळे या गडकिल्ल्यांबाबत सर्वसामान्यांसह शाळा, महाविद्यालये, विदयापीठे यामध्ये अधिक व्यापक जनजागृती करावी. गेल्या 10 वर्षात देशातील 13 स्थळांची जागतिक वारसा स्थळ म्हणून नोंद झाली. त्यामुळे कमी कालावधीत उत्कृष्ट काम करुन निश्चितपणे छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाची साक्ष देणारे हे गड किल्ले जागतिक वारसा म्हणून ओळखले जातील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
यावेळी डॉ. शिखा जैन यांनी जागतिक वारसा नामांकनासाठी हे गडकिल्ले निवडण्यामागे त्यांचे वेगळेपण असल्याचे नमूद केले. तसेच, जागतिक वारसा नामांकनानंतर केंद्र शासनाचा पुरातत्व विभाग आणि राज्य शासन यांच्या मदतीने यासाठीचे सादरीकरण कशा प्रकारे करता येईल, याबाबत त्यांनी मार्गदर्शन केले.डॉ. जान्विज शर्मा यांनी जागतिक वारसा यादीत या गड किल्ल्यांचा समावेश व्हावा, यासाठी काम सुरु केले असलल्याचे सांगितले.
सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव खारगे यांनी राज्यातील गड किल्ल्यांच्या विकासासाठी राज्य शासनाने यापूर्वीच कामाला सुरुवात केली असल्याचे सांगितले. राज्याने महावारसा समिती स्थापन करुन गड किल्ले विकासासाठी राज्य स्तर, जिल्हा स्तर आणि प्रत्यक्ष संबंधित गड किल्ले याठिकाणी अशा समिती स्थापन केल्या आहेत. त्यानुसार काम सुरु आहे. याशिवाय, आता जागतिक वारसा नामांकनानंतर मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरावर समिती असल्याचे त्यांनी सांगितले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या 350 व्या शिवराज्याभिषेक वर्षानिमित्त विविध कार्यक्रम आणि उपक्रम राबविण्यात आले. जागतिक वारसा नामांकनाबाबत अधिक जनजागृती व्हावी, यासाठी विद्यार्थी, युवा यांच्यासाठी विविध उपक्रम राबवून सर्वांचा सहभाग निश्चितपणे वाढविण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
छत्रपती शिवाजी महाराजांचे युद्ध कौशल्य, नीती, गनिमी कावा सर्वांना अभिमानास्पद - मंत्री सुधीर मुनगंटीवार
|