मुख्यमंत्री - माझी लाडकी बहीण' योजनेच्या नोंदणी प्रक्रियेत दलालांचा सुळसुळाट होता कामा नये -पालकमंत्री हसन मुश्रीफ

Chief Minister  Majhi Ladki Bahin scheme registration process should not be facilitated by brokers


By nisha patil - 5/7/2024 7:22:45 PM
Share This News:



कोल्हापूर, दि. 5 : 'मुख्यमंत्री - माझी लाडकी बहीण' योजनेसाठी आवश्यक प्रमाणपत्रे देणे, अर्ज भरुन घेणे आदी प्रक्रिया पार पाडताना पैशांची मागणी होणार नाही, याची दक्षता घ्या. महिलांची अडवणूक, दिरंगाई करुन पैसे घेतल्याचे आढळून आल्यास पोलीस प्रशासनाची मदत घेवून दोषींवर कडक कारवाही करा. कोणत्याही परिस्थितीत दलालांचा सुळसुळाट होऊ देऊ नका, असे स्पष्ट निर्देश देवून योजनेच्या अंमलबजावणीत कोल्हापूर जिल्हा राज्यात अग्रेसर राहिल यासाठी चोख नियोजन करा, अशा सूचना पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केल्या.

 

      "मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने"ची आढावा बैठक पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयातील शाहूजी सभागृहात पार पडली. यावेळी कोल्हापूर महानगरपालिका आयुक्त डॉ. के मंजूलक्ष्मी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस., जिल्हा पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, इचलकरंजी महानगरपालिका आयुक्त ओमप्रकाश दिवटे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक सुषमा देसाई, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अरुण जाधव, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी सुहास वाईंगडे, महिला व बालविकास विभागाच्या उप मुख्य कार्यकारी अधिकारी शिल्पा पाटील आदी उपस्थित होते.

 पालकमंत्री मुश्रीफ म्हणाले, या योजनेसाठी नावनोंदणी, अर्ज करणे आदी कामांसाठी होणारी गर्दी लक्षात घेऊन अर्ज करण्याची मुदत ३१ ऑगस्ट २०२४ पर्यंत वाढविण्यात आली आहे. तथापि 19 ऑगस्ट पर्यंत जिल्ह्यातील जास्तीत जास्त महिलांची नोंदणी होण्यासाठी सूक्ष्म नियोजन करा. तालुकास्तरीय समित्या तात्काळ स्थापन करा. या योजनेअंतर्गत झालेल्या नोंदणीचा दररोज आढावा घ्या. लाभार्थ्यांना विनासायास लाभ मिळवून देण्यासाठी चोख नियोजन करा. या योजनेसाठी जिल्ह्यातील सर्व लाभार्थ्यांची नोंदणी होण्यासाठी तसेच नोंदणी करताना लागणारी आवश्यक प्रमाणपत्रे देणे, अर्ज भरुन घेणे, छाननी करणे व ऑनलाईन अर्ज दाखल करण्यासाठी तहसीलदार, गटविकास अधिकाऱ्यांना सूचना देऊन गावनिहाय शिबिरांचे आयोजन करा, अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या. 

            या योजनेतील पात्र महिलांना महिन्याला 1 हजार 500 रुपये म्हणजे वर्षाला १८ हजार रुपये राज्य शासनाच्या वतीने देण्यात येणार आहेत. 31 ऑगस्ट पर्यंत नोंद झालेल्या सर्व लाभार्थ्यांना जुलै व ऑगस्ट या दोन्ही महिन्यांचा लाभ देण्यात येणार असून सर्व महिलांनी अर्ज नोंदणीसाठी जिल्हा प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

 जिल्हाधिकारी  येडगे म्हणाले, या योजनेसाठी "नारी शक्ती दुत" ॲपवर निःशुल्क ऑनलाईन अर्ज भरण्याची सोय उपलब्ध आहे. कोणतीही अडचण आल्यास तहसीलदार, गटविकास अधिकारी अथवा बालविकास प्रकल्प अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन त्यांनी केले. तसेच जिल्ह्यात अधिकाधिक लाभार्थ्यांची नोंदणी होण्यासाठी करण्यात आलेल्या नियोजनाची तसेच आतापर्यंत झालेल्या नोंदणीची माहिती दिली.

 

            या योजनेअंतर्गत आतापर्यंत झालेल्या नोंदणीमध्ये कोल्हापूर जिल्हा राज्यात अग्रेसर असल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस यांनी दिली.


मुख्यमंत्री - माझी लाडकी बहीण' योजनेच्या नोंदणी प्रक्रियेत दलालांचा सुळसुळाट होता कामा नये -पालकमंत्री हसन मुश्रीफ