बातम्या
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या हस्ते बळीराजा मोफत वीज योजना आणि सौर कृषिपंप योजना लोकार्पण
By nisha patil - 7/10/2024 10:42:19 PM
Share This News:
छत्रपती संभाजीनगर : मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना वीजबिलांच्या पावतीचे वितरण आणि मागेल त्याला सौर कृषिपंप योजनेअंतर्गत आस्थापित कृषिपंपाचे लोकार्पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते रविवारी छत्रपती संभाजीनगर येथे झाले.
पालकमंत्री तथा अल्पसंख्याक विकास व औकाफ, पणन मंत्री अब्दुल सत्तार, गृहनिर्माण व इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे, महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे, सिडकोचे अध्यक्ष संजय शिरसाट, खा.भागवत कराड, आ.सतीश चव्हाण, आ.विक्रम काळे, आ.प्रदीप जैस्वाल, आ.रमेश बोरनारे यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी ना.एकनाथ शिंदे म्हणाले की, मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजनेत राज्य सरकारने शेतकऱ्यांचे कृषी पंपांचे चालू बिल भरण्याचा निर्णय घेतल्यामुळे शेतकऱ्यांना मोफत वीज मिळत आहे. आगामी पाच वर्षे सरकार शेतकऱ्यांचे साडेसात एचपीपर्यंतच्या पंपांचे चालू बिल भरेल असा शासन निर्णय जारी झाला आहे. राज्यातील 44 लाख शेतकऱ्यांना याचा लाभ होणार आहे. सरकारने एप्रिल ते जून या कालावधीच्या बिलापोटी 2750 कोटी रुपये महावितरणला अदा केल्यामुळे शेतकऱ्यांना महावितरणकडून पावत्या पाठविण्यात येत आहेत.
या कार्यक्रमात मा.मुख्यमंत्री आणि मा.उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते शेतकऱ्यांना प्रातिनिधिक स्वरुपात पावत्या प्रदान करण्यात आल्या. शेतकऱ्यांना मोफत वीज देण्याच्या या योजनेत राज्य सरकार कृषी पंपांचे चालू बिल भरत आहे. मा.मुख्यमंत्री तसेच मा. उपमुख्यमंत्र्यांनी राज्य सरकारच्या वतीने शेतकऱ्यांच्या वीज बिलापोटी प्रतिकात्मक धनादेश महावितरणला सुपूर्द केला. महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी हा धनादेश स्वीकारला. यावेळी अपर मुख्य सचिव (ऊर्जा) श्रीमती आभा शुक्ला उपस्थित होत्या.
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मागेल त्याला सौर कृषी पंप या योजनेत राज्यातील शेतकऱ्यांना दहा लाख पंप देण्यात येणार आहेत. केवळ दहा टक्के रक्कम भरून शेतकऱ्यांना सौर ऊर्जा निर्मिती पॅनल्स आणि कृषी पंप मिळणार आहे. अनुसूचित जाती व जमातींच्या शेतकऱ्यांना लाभार्थी हिस्सा केवळ पाच टक्के भरावा लागेल. ऊर्वरित रक्कम केंद्र आणि राज्य सरकारकडून अनुदान म्हणून मिळते. शेतकऱ्यांना स्वतंत्र आणि हक्काचे सिंचनाचे साधन सौर कृषी पंपामुळे मिळणार आहे. यामुळे शेतकऱ्यांना 25 वर्षे वीजबिल नाही. पाच वर्षांत पंप बिघडला तर दुरुस्त करून मिळणार आहे. तसेच चोरीस गेला किंवा मोडतोड झाला तर त्याचा विमा सरकारने काढला आहे. मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेअंतर्गत आजतागायत 2,08,935 सौर पंप मंजूर करण्यात आले आहेत. त्यापैकी 1,67,155 शेतकऱ्यांनी आवश्यक रकमेचा भरणा केला आहे व त्यापैकी 60,000 सौर पंप आस्थाaपित करण्यात आले आहेत. यात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याने प्रथम क्रमांक पटकावला असून, सर्वा धिक पंप या जिल्ह्यात आस्थापित करण्यात आले आहेत. मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना-2.0 अंतर्गत कालच पंतप्रधानांच्या हस्ते 5 सौर प्रकल्पांचे उद्घाटन झाले. येत्या 18 महिन्यांत शेतकऱ्यांची सर्व वीज सौर ऊर्जेद्वारे पुरवली जाणार आहे. त्यासाठी पहिली कृषा ऊर्जा कंपनी स्थापन करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरले आहे.
अजित पवार म्हणाले की, राज्य सरकार पुढील 5 वर्षे शेतकऱ्यांचे वीजबिल भरणार आहे. त्यासाठी सरकारने निधी दिला आहे. शेतकऱ्यांना आता शून्य वीजबिले पाठवली जात आहेत.
यावेळी मा. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते अर्जदारांना अर्ज मंजुरीचे व अनुदानाचे एसएमएस पाठविण्यात आले. तसेच मा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मा. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व मा. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बटण दाबून आतापर्यंत शेतात बसविलेले 60,000 सौर कृषी पंप रिमोटद्वारे चालू करून योजनेचे लोकार्पण केले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या हस्ते बळीराजा मोफत वीज योजना आणि सौर कृषिपंप योजना लोकार्पण
|