बातम्या
महिला सन्मान सोहळ्याच्या यशस्वी आयोजनासाठी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या सूचना
By nisha patil - 8/20/2024 10:47:40 AM
Share This News:
कोल्हापूर जिल्ह्यात २२ ऑगस्ट रोजी तपोवन मैदानावर आयोजित महिला सन्मान सोहळ्याच्या नियोजनाची जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी बारकाईने पाहणी केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत होणाऱ्या या कार्यक्रमासाठी त्यांनी सर्व संबंधित अधिकाऱ्यांना योग्य नियोजन आणि जबाबदाऱ्या चोख पार पाडण्याच्या सूचनाही दिल्या.
प्रस्तावित कार्यक्रमानुसार, 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजनेच्या लाभार्थ्यांना सन्मानित करण्यात येणार आहे. यासाठी जिल्हाधिकारी यांनी परिसरातील साफसफाई, फूड पॅकेट्स, पिण्याचे पाणी, फिरत्या स्वच्छतागृहांची व्यवस्था, पार्किंग, आणि वाहतूक व्यवस्थेची विशेष काळजी घेण्याच्या सूचना दिल्या आहेत.
या कार्यक्रमाची नियोजन बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली, ज्यामध्ये उपायुक्त, महानगरपालिका आयुक्त, जिल्हा परिषद कार्यकारी अधिकारी आणि इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे आढावा घेत कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आवश्यक त्या सूचना केल्या.
कार्यक्रम स्थळी लाभार्थ्यांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत, सर्व आवश्यक सुविधांची योग्य व्यवस्था करण्यात यावी, असेही त्यांनी सांगितले.
महिला सन्मान सोहळ्याच्या यशस्वी आयोजनासाठी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या सूचना
|