बातम्या
गोकुळ शिरगावमध्ये प्रदूषणाचा धोका..
By nisha patil - 7/2/2025 7:41:00 PM
Share This News:
गोकुळ शिरगावमध्ये प्रदूषणाचा धोका...
घातक रसायनयुक्त पाण्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान
पाकीट संस्कृती’मुळे प्रशासनाचा आळशीपणा?
गोकुळ शिरगाव औद्योगिक वसाहतीतील काही कारखान्यांकडून वर्षानुवर्षे घातक रसायनयुक्त पाणी शेजारच्या ओढ्यात सोडले जात आहे, त्यामुळे परिसरातील विहिरींचे पाणी दूषित झाले आहे. या विषारी पाण्यामुळे कोणतेही जलचर जिवंत राहत नाहीत, तसेच शेती व फळझाडांवर त्याचा मोठा परिणाम होत आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) याविरोधात वारंवार गोशीमा असोसिएशन आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाला निवेदने दिली आहेत, मात्र कोणतीही कारवाई झालेली नाही.
स्थानिकांचा आरोप आहे की, प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि कारखानदार यांच्यातील ‘पाकीट संस्कृती’मुळे ही समस्या दुर्लक्षित केली जात आहे. “निवेदनं देऊनही जर काहीच होत नसेल, तर भविष्यात कायदा हातात घ्यावा लागेल आणि ठोकशाही काय असते ते दाखवावे लागेल,” असा इशारा शिवसेनेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.
नेर्ली-तामगाव येथे काही खाजगी ठिकाणी मोठ्या प्रमाणात जळक्या तेलाची रिकामी बॅरेल्स आणि रबरी टायरी जाळल्या जात आहेत. रात्री अपरात्री हा प्रकार होत असून, या धुरामुळे परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. याचा फटका शेतीलाही बसत असून हवेतील विषारी प्रदूषणामुळे फळबागा आणि पीकं प्रभावित होत आहेत.
या दोन्ही गंभीर विषयांवर ताबडतोब कारवाई झाली नाही, तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करेल, असा इशारा देण्यात आला आहे. पर्यावरणाच्या विनाशाला जबाबदार असणाऱ्यांवर कडक कारवाई झाली नाही, तर या अन्यायाविरोधात लढा उभारण्यात येईल, असे स्थानिक नागरिक आणि सामाजिक कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे.
गोकुळ शिरगावमध्ये प्रदूषणाचा धोका..
|