बातम्या

"घातक कट उघड! पोलिसांच्या धडाकेबाज कारवाईत तलवारींचा साठा जप्त"

Deadly conspiracy exposed


By nisha patil - 2/24/2025 9:43:32 PM
Share This News:



"घातक कट उघड! पोलिसांच्या धडाकेबाज कारवाईत तलवारींचा साठा जप्त"

 कोल्हापूरच्या राजारामपुरी पोलीस ठाणे हद्दीत घातक शस्त्रसाठ्याचा पर्दाफाश करत पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. राहुल संतोष घोलप (वय २३, रा. दत्त मंदिर जवळ, राजेंद्रनगर, कोल्हापूर) याच्या घरातून १० धारधार तलवारी जप्त करत त्याला अटक करण्यात आली आहे.

राजारामपुरी पोलीस ठाण्याचे निरीक्षक सुशांत चव्हाण यांना गोपनीय बातमीदाराकडून माहिती मिळाली की, आरोपी घरी घातक हत्यारे साठवून ती विक्रीसाठी ठेवतो. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय भोजणे यांच्या नेतृत्वाखाली गुन्हे शोध पथकाने राजेंद्रनगर येथे छापा टाकला.

पोलिसांना आरोपीच्या घराच्या दुसऱ्या मजल्यावरील लोखंडी जिन्याजवळ, आडोशात गोणपाटात लपवलेल्या १० धारधार तलवारी मिळून आल्या. त्या ताब्यात घेऊन पोलिसांनी १७,४००/- रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला.

सदर कारवाईत पोलिसांनी राहुल घोलप यास अटक करून भारतीय हत्यार कायदा कलम ५ आणि २५ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. आरोपीने हत्यारांचा साठा कशासाठी केला होता, याचा शोध घेण्यासाठी पुढील तपास सुरू आहे.

या कारवाईत पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय भोजणे, परि. पोलीस उपनिरीक्षक रुपेश इंगळे, सहायक फौजदार समीर शेख, कौशल्या जाधव तसेच पोलीस अंमलदार विशाल शिरगांवकर, अमोल पाटील, नितीश बागडी, सुशांत तळप, महेश महेकर, गौरव चौगुले यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.

या कारवाईसाठी पोलीस अधीक्षक महेंद्र पंडीत, अपर पोलीस अधीक्षक जयश्री देसाई आणि उपविभागीय पोलीस अधिकारी अजित टिक्के यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.

"घातक शस्त्रसाठा पोलिसांनी वेळीच हाती घेतल्यामुळे संभाव्य गुन्हे रोखण्यास मदत होईल", असे पोलिसांकडून सांगण्यात आले.


"घातक कट उघड! पोलिसांच्या धडाकेबाज कारवाईत तलवारींचा साठा जप्त"
Total Views: 43