बातम्या
अनधिकृत वाहनांवर कारवाईची मागणी
By nisha patil - 1/18/2025 3:20:36 PM
Share This News:
अनधिकृत वाहनांवर कारवाईची मागणी
कोल्हापूर: जिल्ह्यात पोलीस, आर्मी, महाराष्ट्र शासन, प्रेस अशा नावाने अनधिकृतपणे फिरणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्याची मागणी युवासेनेच्या कार्यकर्त्यांनी केली आहे. या संदर्भातील निवेदन जिल्हा उपजिल्हाधिकारी अजित टिके यांना देण्यात आले.
सध्या शहरात पोलीस, आर्मी, महाराष्ट्र शासन, प्रेस अशा नावाने असलेल्या गाड्या मोठ्या प्रमाणात अनधिकृतपणे फिरताना दिसत आहेत. या गाड्या नियमांचे उल्लंघन करताना दिसून येत असून, शहरातील कायदा व सुव्यवस्थेला धक्का लागत आहे. पर्यटनदृष्ट्या महत्त्वाच्या कोल्हापूरसारख्या शहरात अशा प्रकारांवर नियंत्रण ठेवणे गरजेचे असल्याचे मत निवेदनाद्वारे व्यक्त करण्यात आले आहे.
युवासेनेने प्रशासनाला इशारा दिला आहे की, जर अशा गाड्यांवर तातडीने कारवाई झाली नाही, तर युवासेना स्वतःच्या पद्धतीने कारवाई करेल आणि त्यातून निर्माण होणाऱ्या परिस्थितीला प्रशासन जबाबदार असेल.
निवेदन देताना युवा सेना जिल्हाप्रमुख मंजीत माने, जिल्हा चिटणीस चैतन्य देशपांडे, उपजिल्हाप्रमुख बंडा लोंढे, महानगर प्रमुख सनराज शिंदे, शहरी युवा अधिकारी सुमित मेळवंकी, शहर चिटणीस युवराज मोरे, शहर सह समन्वयक शुभम पाटील आणि इतर कार्यकर्ते उपस्थित होते.
प्रशासनाच्या पुढील पावलांवर सर्वांचे लक्ष आहे.
अनधिकृत वाहनांवर कारवाईची मागणी
|