विशेष बातम्या
महिला रक्तदान चळवळीचा निर्धार: ओंकार वेलफेअर फाउंडेशनचा पुढाकार
By nisha patil - 11/3/2025 3:23:39 PM
Share This News:
महिला रक्तदान चळवळीचा निर्धार: ओंकार वेलफेअर फाउंडेशनचा पुढाकार
कोल्हापूर – करवीर संस्थानच्या संस्थापिका महाराणी ताराराणी यांच्या 350 व्या जयंतीनिमित्त ओंकार वेलफेअर फाउंडेशनने महिला रक्तदान चळवळ सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. महिलांच्या नेतृत्वाखाली ही चळवळ पुढे नेण्यासाठी महिलांची स्वतंत्र संघटना स्थापन केली जाणार आहे.
शिवाजी पेठेतील शिवाजी मंदिरात ओंकार वेलफेअर फाउंडेशन आणि मुंबईतील मैत्री दिंडी ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने महिला रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. उद्घाटन जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाच्या कनिष्ठ अभियंता माया सुर्वे, सरिता शिंदे आणि वैशाली कदम यांच्या हस्ते महाराणी ताराराणी यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले.
शिबिरात 35 महिलांनी रक्तदान केले, तर 100 हून अधिक महिलांनी उपस्थिती लावली. मात्र, हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी असल्याने काही महिलांना रक्तदान करता आले नाही. तरीही, त्यांचा भगवा फेटा बांधून आणि वाचनीय पुस्तके भेट देऊन सन्मान करण्यात आला.महिला रक्तदान चळवळ अधिक व्यापक करण्यासाठी सोमवारी (17 मार्च) रक्तदान केलेल्या महिलांची आणि शिवाजी पेठेतील महिलांची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत महिला संघटना स्थापन करण्याचा पुढील टप्पा ठरवला जाणार आहे.
या उपक्रमात ओंकार वेलफेअर फाउंडेशनचे अध्यक्ष अमोल सरनाईक, मैत्री दिंडी ग्रुपचे आभास पाटील, रक्तदाते धनंजय नामजोशी, ओंकार मोरे, तसेच रामेश्वरी आरडे, सुचिता पाटील, कल्पना सरनाईक, नेहा माने, माऊली सुर्वे आणि पूजा पाटील आदी उपस्थित होते.
65 वेळा रक्तदान केलेल्या अनिता काळे यांनी एलईडी स्क्रीनद्वारे रक्तदानाचे फायदे आणि गरज याविषयी उपस्थित महिलांना मार्गदर्शन केले. महालक्ष्मी ब्लड बँकेच्या सहकार्याने रक्त संकलन करण्यात आले. भविष्यातही असे उपक्रम सातत्याने राबवले जाणार असल्याचे आयोजकांनी स्पष्ट केले.
महिला रक्तदान चळवळीचा निर्धार: ओंकार वेलफेअर फाउंडेशनचा पुढाकार
|