विशेष बातम्या
शेतकऱ्यांसाठी निराशाजनक अर्थसंकल्प – राजू शेट्टींची तीव्र प्रतिक्रिया
By nisha patil - 10/3/2025 8:00:45 PM
Share This News:
शेतकऱ्यांसाठी निराशाजनक अर्थसंकल्प – राजू शेट्टींची तीव्र प्रतिक्रिया
जयसिंगपूर (प्रतिनिधी) – राज्य सरकारने आज सादर केलेला अर्थसंकल्प शेतकरी, शेतमजूर, कामगार आणि छोट्या व्यापाऱ्यांसाठी निराशाजनक असल्याची टीका शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी केली आहे. कृषीप्रधान असलेल्या राज्याच्या अर्थसंकल्पात शेतीविषयक योजनांना दुय्यम स्थान मिळाल्याचा आरोप त्यांनी केला.
राजू शेट्टी म्हणाले, "शेतीसाठी कर्जमाफी नाही, सिंचन कर गाळात, कृषी प्रक्रिया उद्योग रसातळाला, खतांचे दर आकाशाला भिडले, आणि शेतकरी मात्र शक्तीपीठाच्या भूसंपादनात अडकला आहे. राज्यकर्ते, अधिकारी आणि दलाल राजमहालात तर शेतकरी मात्र शिवारात तणकाटासारखा दिसत आहे."
शेतीविषयक योजनांचा अभाव
महायुतीने निवडणुकीत दिलेल्या आश्वासनांची आठवण करून देताना त्यांनी सरकारवर ताशेरे ओढले. निवडणुकीपूर्वी जाहीरनाम्यात दिलेली वचने पूर्ण करण्याची आवश्यकता होती, पण आजच्या अर्थसंकल्पात ती पूर्णपणे दुर्लक्षित करण्यात आली आहेत.
त्यांच्या मते, सरकारने किमान हमीभावावर २०% अनुदान, शेतकरी कर्जमाफी, खतांवरील जीएसटी कपात, सोयाबीनला ६,००० हमीभाव, कृषी प्रक्रिया केंद्र, पशुसंवर्धन व दुग्धविकासासाठी आधुनिक तंत्रज्ञान आदी मुद्द्यांना पूर्णपणे बगल दिली आहे.
सिंचन कर आणि कर सवलतींवर विरोध
राजू शेट्टी यांनी सिंचन करावरील घसरणीबाबतही सरकारवर टीका केली. जलसंपदा मंत्री सिंचन कर स्थगितीची घोषणा करत असताना वित्तमंत्र्यांनी त्यावर कोणतेही स्पष्टीकरण दिले नाही, हे खेदजनक असल्याचे त्यांनी म्हटले.
"बड्या उद्योगपतींना कर सवलती देण्यात आल्या, मात्र शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडण्यात आले आहे. कृषीप्रधान राज्याला कृषीविकासाकडे पाठ फिरवल्याने याचे गंभीर परिणाम भविष्यात दिसून येतील," असेही ते म्हणाले.
शेती व्यवसाय आधीच संकटात आहे, त्यात सरकारने बजेटच्या माध्यमातून दिलासा देण्याऐवजी अधिकच संकटात टाकल्याचा आरोप करत, राजू शेट्टी यांनी राज्य सरकारच्या कृषी धोरणावर पुनर्विचार करण्याची मागणी केली आहे.
शेतकऱ्यांसाठी निराशाजनक अर्थसंकल्प – राजू शेट्टींची तीव्र प्रतिक्रिया
|