बातम्या
जिल्हास्तरीय ‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ या अभियानाच्या पुरस्काराचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते वितरण
By nisha patil - 6/24/2024 12:19:46 PM
Share This News:
मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा या अभियानामध्ये जिल्ह्यात प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक प्राप्त शाळांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते देवगिरी या शासकीय निवासस्थानी रविवारी बक्षीस वितरण करण्यात आले.
राज्यातील सर्व व्यवस्थापनांच्या व सर्व माध्यमांच्या शाळांमधील शिक्षक, पालक,विद्यार्थी व माजी विद्यार्थी यांच्यामध्ये शाळेप्रती उत्तरदायित्वाची भावना निर्माण व्हावी व त्यायोग्य स्पर्धात्मक वातावरणातून विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी आनंददायी व प्रेरणादायी वातावरण मिळावे यासाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजनेअंतर्गत मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियान राज्य शासनातर्फे संपूर्ण राज्यात राबविण्यात आले.
शासकीय आणि खाजगी व्यवस्थापन गटात या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. प्रथम ११ लक्ष, द्वितीय पाच लक्ष तर तृतीय तीन लक्ष असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. शासकीय गटातील तीन शाळांना पुरस्कार वितरित करण्यात आले. यात रामटेक तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भिलेवाडा, हिंगणा तालुक्यातील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा भारकस, सावनेर तालुक्यातील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा खुर्सापुर या शाळांचा समावेश आहे.
खाजगी व्यवस्थापन गटातील 3 शाळांनाही बक्षीस वितरित करण्यात आले. यात काटोल तालुक्यातील लाखोटीया भुतडा विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय कोंढाळी, नागपूर ग्रामीण तालुक्यातील श्री सत्यसाई माध्यमिक विद्यालय नरसाळा तसेच कळमेश्वर तालुक्यातील न्यू इंग्लिश हायस्कूल मोहपा या शाळांचा समावेश आहे.
याप्रसंगी आ. टेकचंद सावरकर, आ. आशिष जायस्वाल, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटणकर, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौम्या शर्मा यांच्यासह शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष, मुख्याध्यापक व गटशिक्षणाधिकारी उपस्थित होते.
जिल्हास्तरीय ‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ या अभियानाच्या पुरस्काराचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते वितरण
|