बातम्या

महावितरणचे कर्तव्यदक्ष अधीक्षक अभियंता अंकुर कावळे ‘कोल्हापूरी फेट्याचे मानकरी’

Dutiful Superintendent Engineer of Mahavitaran Ankur Kawle Mankari of Kolhapuri Fetya


By nisha patil - 6/27/2024 8:07:36 PM
Share This News:



महावितरणच्या कोल्हापूर मंडळाचे कर्तव्यदक्ष अधीक्षक अभियंता अंकुर कावळे यांची मुंबई मुख्यालयात नुकतीच बदली झाली आहे. २०१९ च्या महापूरावेळी ते कोल्हापूरात रूजु झाले होते. महावितरण यंत्रणेचे अतोनात नुकसान झाले होते. अशा परिस्थितीत श्री.कावळे यांच्या नेतृत्वात आपातकालीन परिस्थिती मोठ्या शिताफीने हाताळून वीजपुरवठा अल्पावधीत पुर्ववत करण्यात महावितरणला यश आले. या कामगिरीचे देशपातळीवर कौतुक झाले. प्रारंभीच त्यांनी आपल्या कौशल्याची चुणूक दाखविली. २०२१ च्या महापूराच्या वेळी त्यांनी केलेल्या आपत्तीपूर्व नियोजनामुळे आपत्तीचा सामना करणे अधिक सोपे झाले. सुरळीत वीजसेवेसह महावितरणचे होणारे नुकसानही टळले. शेंडा पार्क व वायपी पवार नगर  उपकेंद्रादरम्यान भूमिगत वीज वाहिनीचे काम पूर्ण करण्यात आले. या भूमिगत वीज वाहिनीमुळे शाहू मिल, शिवाजी विद्यापीठ, घाडगे पाटील, वाय पी पवार नगर या चार उपकेंद्राना रिंग फीडिंगची सोय उपलब्ध झाली आहे. पंचगंगा तीरावर शिरदवाडला टॉवरगुढी उभारली. 

कोरोना संकटाच्या काळात अखंडित व सुरळीत वीजसेवा पुरविण्यासाठी त्यांनी प्रचंड मेहनत घेतली. कोविड विलगीकरण केंद्रे, रुग्णालयांच्या वीजपुरवठ्यावर श्री.कावळे यांनी कटाक्षाने लक्ष दिले. ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पांना तत्काळ वीजजोडणी उपलब्ध करून दिली. त्यांच्यावर जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी अतिग्रे येथील घोडावत युनिर्व्हसिटी कोरोना रुग्णालयाचे प्रमुखपदाची जबाबदारी सोपविली होती. ती त्यांनी चोखपणे पार पाडली. त्यावेळी त्यांच्यावर कोल्हापूर परिमंडळाच्या  मुख्य अभियंता पदाचाही अतिरिक्त् कार्यभार होता.

पन्हाळा, विशाळगड, भुदरगड,पारगड इ. गडकिल्ल्यांवरील विद्युत वितरण सुविधांचे जाळे श्री.कावळे यांनी जातीने लक्ष पुरवून बळकट केले. पन्हाळगडावर  स्वच्छता मोहिमही रबविली. गडहिंग्लज, चंदगड, आजरा या दुर्गम भागातील हरपवडेसारख्या अनेक पाड्यात वीज पोहचविली,  विद्युत सेवेसाठी यंत्रणा उभारली. अखंडित वीजसेवेसाठी विद्युत यंत्रणेच्या देखभाल दुरूस्तीवर भर दिला. उच्च दाब वितरण प्रणाली व कृषी धोरण 2020 च्या  प्रभावी अंमलबजावणीच्या माध्यमातून कृषीपंपाच्या प्रलंबित वीजजोडण्या दिल्या. ग्राहक तक्रार निवारण मेळावे आयोजित करून ग्राहकांच्या विविध तक्रारींचा जलद निपटारा केला. शेतीला दिवसा वीज मिळावी, यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेची पायाभरणी केली. जनमित्रांची विद्युत सुरक्षा प्रशिक्षणे घेऊन सुरक्षित काम करण्यासाठी जनमित्रांचे प्रबोधन केले. त्याची फलश्रुती म्हणून गत वर्षभरात एकही कर्मचारी अपघात झाला नाही. शाळा, महाविद्यालयात जाऊन विद्यार्थ्यांचे प्रबोधन घडवून आणले. वीज बिल वसुली, वीज चोरी रोखणे, विजेची हानी कमी करणे हे दैनंदिन कामकाज नेटकेपणाने पाहिले.

सुमंगलम पंचमहाभूत लोकोत्सवासाठी सुरळीत वीजपुरवठा व्हावा, याकरिता महावितरणकडून जलद गतीने विद्युत सुविधांची उभारणी करण्यात आली. याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, तत्कालीन पालकमंत्री दीपक केसरकर यांनी महावितरणच्या कामाचे कौतुक केले.जिल्ह्याच्या विद्युत विभागाचा प्रमुख या नात्याने श्री.कावळे यांनी लोकप्रतिनिधी, स्थानिक जिल्हा प्रशासन, विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळी, औद्योगिक ग्राहक, उद्योजक, सामाजिक संस्था यांच्यासमवेत उत्तम समन्वय राखला. महालक्ष्मी मंदीर परिसरात भुमिगत वीज वाहिन्याचे जाळे उभारले. गणेश विसर्जन मिरवणूकीचा मार्ग मोकळा केला. महावितरणच्या कारभारात गुणात्मक सुधारणा करीत तो अधिकाधिक लोकाभिमुख करण्याकडे श्री.कावळे यांचा कल राहिला. कोल्हापूरच्या मातीचा लोकहिताचा वारसा जपण्याचे काम त्यांनी आपल्या कारकीर्दीत अविरतपणे केले. म्हणूनच ते कोल्हापूरी फेट्याचे मानकरी  ठरले आहेत.


महावितरणचे कर्तव्यदक्ष अधीक्षक अभियंता अंकुर कावळे ‘कोल्हापूरी फेट्याचे मानकरी’