आरोग्य
वाईट सवयींचा परिणाम यकृतावर
By nisha patil - 11/25/2024 12:13:31 PM
Share This News:
आरोग्य हेच धन असे विचार आपण ऐकत असतो. मात्र, वेगवान जगात सर्वाधिक दुर्लक्ष होते ते आरोग्याकडे. सगळ्यासाठी वेळ असतो, पण व्यक्तीला स्वतःच्या शरीराकडे लक्ष द्यायला वेळ नसतो. काही कालावधीनंतर याचे परिणाम दिसतात. शरीरधर्म सुरळीत चालण्यासाठी काही अवयव अत्यंत महत्त्वाचे असतात. जसे यकृत. यकृत हा अवयव शरीराचा महत्त्वाचा अवयव आहे. शरीरातील काही क्रिया या यकृतामुळे सुरू असतात. वेगवान जीवनशैलीत घरचा डब्याची जागा तयार अन्नाने घेतली आहे. तर व्यायामाला वेळच नसतो. परिणामी यकृतासारख्या अवयवांवर दुष्परिणाम होतो.
शरीराच्या जवळपास 500 हून जास्त क्रियांमध्ये यकृत फार महत्त्वाची भूमिका बजावत असते. यकृत बिघडले तर अनेक शारीरिक समस्या उद्भवतात. हल्ली यकृताचे विकार होण्याचे प्रमाण दिसून येत आहे. यासाठी कारण आहे म्हणजे जीवनशैलीतील बदल. आहार विहारातील बदलाचाही मोठा परिणाम होतो. दीर्घ काळ शरीरात दिसून येणारे बदल नजरेआड करणे या सर्वांमुळे यकृताशी निगडित त्रास वाढतात. यकृताशी निगडित आजार आणि यकृत चांगले रहावे यासाठी काय करावे याची माहिती पाहूया.
शरीराचे आरोग्य त्यातील अवयवांच्या आरोग्यावरही अवलंबून असते. यकृतही अशाच प्रकारे खूप महत्त्वाचा अवयव आहे. सुमारे पाचशेहून अधिक क्रियांमध्ये यकृताची भूमिका फार महत्त्वाची असते. शरीराची चयापचयक्रिया योग्य राखण्याचे कामही यकृत करत असते. आपण खाल्लेले अन्न पचवून त्यापासून ऊर्जेची निर्मिती करणे आणि शरीरातील वाईट पदार्थ काढून टाकण्याचे कामही यकृत करते. रक्त हे शरीराचा आरसा आहे, असे म्हटले जाते. रक्त स्वच्छ राखण्यातही यकृताचे कार्य महत्त्वाचे असते. रक्तातील टाकाऊ पदार्थ गाळण्याचे काम यकृतालाच करायचे असते. त्यामुळेच यकृताचे काम बिघडू नये यासाठीच प्रयत्न करायला हवे. कारण यकृताचे काम बिघडले तर अनेक प्रकारचे विकार शरीरात घर करू शकतात.
यकृताला धोका आहे का? यकृत एक अवयवही आहे आणि ग्रंथीही आहे. व्यक्तीला जिवंत ठेवण्यासाठी शरीरातील अनेक रासायनिक क्रियांमध्ये यकृत मदत करत असते. त्याशिवाय यकृतातून अनेक रसायने स्रवतात. शरीराचे विविध अवयवांचे आरोग्य चांगले रहावे यासाठीही यकृत महत्त्वाची भूमिका करते. पण यकृताचे आरोग्य खूप बिघडले तर यकृताची दुरुस्ती करणे सोपी गोष्ट नाही. वेगवान झालेल्या आयुष्यात शरीर दर्शवत असलेल्या लक्षणांकडे आपले लक्ष नसते. अर्थात विविध विकारांची लक्षणे निरनिराळी असतात. मात्र, यकृताच्या काही रोगांमध्ये दिसणारी काही सर्वसामान्य लक्षणे आहेतः जसे त्वचा, डोळे पिवळे पडणे, पोट किंवा पायाच्या घोट्याला सूज येणे, उलटी होणे, भूक कमी लागणे, सतत चक्कर येणे, खाज जाणवणे, लघवी अतिपिवळी होणे, शौचाला रक्त पडणे.
मुख्य समस्या : हेपेटायटिस किंवा कावीळ : यकृताशी निगडीत सर्वात मोठी समस्या म्हणजे हेपेटायटिस. यकृतामध्ये विषाणू संसर्ग झाल्याने कावीळ होते. त्यामुळे यकृताला सूज येते. हा संसर्ग वाढला, तर यकृत पूर्णपणे खराब होते. हेपेटायटिस किंवा कावीळ पाच प्रकारची असते. हेपेटायटिस ए, बी, सी. डी आणि ई. हेपेटायटिस ए आणि ई हे हेपेटायटिसचे प्रकार दूषित पाणी आणि दूषित अन्न यांच्या सेवनाने होतात. मुले आणि वृद्ध लोक यांच्यामध्ये ही कावीळ होण्याचे प्रमाण अधिक असते. खूप गर्दीच्या ठिकाणी जेथे स्वच्छतेची फारशी काळजी घेतली जात नाही, अशा ठिकाणी या हेपेटायटिस संसर्गाचा प्रभाव अधिक दिसून येतो. हेपेटायटिस बी, सी आणि डी हे संक्रमित व्यक्तीच्या रक्त किंवा इतर द्रव पदार्थांच्या संपर्कात आल्याने होते. हेपेटायटिस ए आणि सी यांचा संसर्ग हा गंभीर असल्याचे मानले जाते. हा संसर्ग पुढे जाऊन लिव्हर सिरोसिस आणि कर्करोग होण्यासही कारण ठरते. हेपेटायटिस टाईप ए आणि बी यापासून बचाव करण्यासाठी लस उपलब्ध आहे. हेपेटायटिस सी आणि ई यांच्यासाठी मात्र काहीही लस उपलब्ध नाही.
*लिव्हर सिरोसिस : हा विकार निश्चितच गंभीर आहे. कारण, यामध्ये यकृताला कायमस्वरूपी इजा होऊ शकते. यकृत आकुंचन पावते आणि कडक होते. लिव्हर सिरोसिसमध्ये यकृताच्या पेशी नष्ट होतात, त्यांची जागा तंतुमय घटकांनी घेतला. आहाराच्या चुकीच्या सवयी, अतिमद्यपान यामुळे ही समस्या निर्माण होऊ शकते. जास्त चरबीयुक्त पदार्थ, मांसाहारी पदार्थ सेवन केल्याने ही समस्या निर्माण होऊ शकते. रक्तातील कोलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढमध्ये आणि काही विशिष्ट औषधांमुळेही ही समस्या निर्माण होते. यकृताला झालेला हा संसर्ग प्रमाणाबाहेर वाढल्यास केवळ लिव्हर ट्रान्सप्लांट हा एकच उपाय करता येतो
वाईट सवयींचा परिणाम यकृतावर
|