बातम्या

बुरशी विरोधी पद्धतीच्या संशोधनासाठी डॉ. राकेश कुमार शर्मा यांना पीएच.डी.

For research on antifungal methods


By nisha patil - 7/15/2024 7:20:43 PM
Share This News:



डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेजचे अधिष्ठाता डॉ. राकेश कुमार शर्मा यांनी केलेल्या मानवी शरीरातील बुरशी विरोधी पद्धतीच्या संशोधनासाठी डी. वाय. पाटील विद्यापीठाकडून पीएच.डी. मिळवली आहे. डॉ. शर्मा यांनी ‘आयसोथियोसायनेट डेरिव्हेटिव्हज ॲज अँटीफंगल्स:  अ स्टडी इन कॅन्डिडा अल्बिकन्स’ या विषयावर प्रबंध सादर केला होता.  त्यांना डॉ. मोहन करूपाईल यांचे मार्गदर्शन लाभले. 

  डॉ. शर्मा हे गेल्या 8 वर्षापासून डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेजचे अधिष्ठाता म्हणून कार्यरत असून ख्यातनाम स्त्रीरोग तज्ञ म्हणून त्यांची ओळख आहे.  त्यापूर्वी त्यांनी आर्मी हॉस्पिटलमध्ये प्रदीर्घ सेवा दिली आहे. भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्या (आयसीएमआर) नियामक मंडळावर ते कार्यरत आहेत.  
  
या संशोधनाबाबत अधिक माहिती देताना डॉ. शर्मा म्हणाले, मानवी शरीरामध्ये तयार होणाऱ्या बुरशी (फंगल्स) वर नियंत्रण मिळविण्याबाबत आपले  संशोधन सुरु आहे.  मधुमेह, कर्करोग ग्रस्त रुग्ण, वयोवृद्ध अथवा व्हेन्टीलेटरवर असलेल्या रुग्णामध्ये प्रतिकारशक्ती कमी झालेली असते. अशा रुग्णामध्ये जुनाट बुरशीची मोठ्या प्रमाणावर वाढ होऊन त्याची बायोफिल्म तयार होते. त्यावर बुरशी विरोधी औषधाचा परिणाम होत नाही. त्यामुळे झाडांपासून एक नैसर्गिक उत्पादन संशोधित करण्यात आले असून त्यामुळे औषधाची परिणामकारकता वाढवण्यास मदत होणार असल्याचे डॉ. शर्मा यांनी सांगितले. प्रयोगशाळेत संशोधित केलेल्या या पद्धतीचा शरीरात फंगल्स नियंत्रित करणे हा प्रमुख उद्देश आहे.

  प्रयोगशाळेतील निष्कर्षांमध्ये  या पद्धतीला चांगले परिणाम दिसून आले असून त्याचे कोणतेही साईड इफेक्ट नाहीत. याबाबत आणखी प्रयोग सुरु आहेत. लवकरच या पद्धतीचे प्राण्यावर प्रयोग करून त्याची उपयुक्तता अधिक तपासली जाईल. विविध चाचण्यानंतर हे औषध उत्तम ‘अन्टी फंगल’ बनेल असा विश्वास डॉ. शर्मा यांनी व्यक्त केला.

    या यशाबद्दल डॉ. शर्मा यांचे विद्यापीठाचे कुलपती डॉ. संजय डी. पाटील, संस्थेचे उपाध्यक्ष आमदार सतेज पाटील, विश्वस्त आमदार ऋतुराज पाटील, विश्वस्त पृथ्वीराज पाटील, कुलगुरू डॉ. राकेश कुमार मुदगल, कुलसचिव डॉ. व्ही. व्ही. भोसले, परीक्षा नियंत्रक अभय जोशी यांनी अभिनंदन केले आहे.


बुरशी विरोधी पद्धतीच्या संशोधनासाठी डॉ. राकेश कुमार शर्मा यांना पीएच.डी.
Total Views: 34