बातम्या
कोल्हापूर: व्हीनस कॉर्नर येथे तलवारीच्या धाकावर जबरी चोरी; दोन आरोपी अटकेत
By nisha patil - 2/18/2025 8:26:28 PM
Share This News:
कोल्हापूरच्या शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत १६ फेब्रुवारी २०२५ रोजी रात्री ११.३० वाजता व्हीनस कॉर्नर येथील मेडिकल स्टोअर्समध्ये खरेदीसाठी गेलेल्या आकाश बनमाली पंडित (वय २१) यांच्यावर दोन अनोळखी इसमांनी तलवार व सत्तूरचा धाक दाखवून हल्ला केला. या हल्ल्यात त्यांनी पंडित यांचा चॉकलेटी रंगाचा विवो कंपनीचा मोबाईल आणि रोख रक्कम रुपये ७,०००/- हिसकावून नेली. पंडित यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्यानंतर, भारतीय दंड संहिता २०२३ कलम ३०९ (४) आणि हत्यार कायदा कलम ४,२५ अंतर्गत जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलीस निरीक्षक संतोष डोके यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाने तपास सुरू केला. सीसीटीव्ही फुटेज आणि बातमीदारांच्या मदतीने माहिती मिळाली की, आरोपी चोरीचा मोबाईल विक्रीसाठी कल्याण ज्वेलर्स, व्हीनस कॉर्नर येथे येणार आहेत. त्यानुसार, पोलीस उपनिरीक्षक अंकुश कारंडे आणि गुन्हे शोध पथकाने सापळा रचला. रात्री १ वाजता पांढऱ्या रंगाची मोपेड त्या ठिकाणी येऊन थांबली. बातमीदाराच्या वर्णनाशी मिळत्या-जुळत्या व्यक्तींना पाहून, पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. प्राथमिक चौकशीत त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली, परंतु अधिक तपासानंतर त्यांनी आपली नावे यश उर्फ सत्यनारायण हिराकांत डावाळे (वय १९) आणि पृथ्वीराज सुनील लाखे (वय २१) असल्याचे सांगितले.
त्यांची झडती घेतली असता, त्यांच्याकडे चोरीचा चॉकलेटी रंगाचा विवो मोबाईल, मुठ नसलेली तलवार, आणि सत्तूर आढळले. अधिक चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली असून, पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक पल्लवी यादव करीत आहेत.
कोल्हापूर: व्हीनस कॉर्नर येथे तलवारीच्या धाकावर जबरी चोरी; दोन आरोपी अटकेत
|